भाजपमध्ये उमेदवारापेक्षा पक्षालाच अधिक प्राधान्य, पुणे पदवीधरमधून पुन्हा भाजपचाच विजय, शेखर चरेगावकर यांचा विश्वास 

प्रमोद बोडके
Sunday, 29 November 2020

सहकाराच्या समस्यांसाठी अभ्यास गट 
साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसाय, सुतगिरणी यासह महाराष्ट्रात असलेल्या विविध सहकारी संस्थांमध्ये काय अडचणी आहेत? त्या अडचणी सोडवण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात? यासाठी भाजपच्या सहकार आघाडीच्यावतीने सर्वपक्षीय अभ्यासगटाची नियुक्ती केली जाणार आहे. भाजपच्या सहकार आघाडीचे सहसंयोजक पद आपल्याकडे असून सहकार आघाडीच्या माध्यमातून हा अभ्यास गट नियुक्त केला जाणार आहे. त्यानंतर सहकाराला ऊर्जितावस्था आणण्यासाठी ऍक्‍शन प्लॅन तयार केला जाणार असल्याचेही शेखर चरेगावकर यांनी सांगितले. 

सोलापूर : बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह देशातील विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भाजपचा कार्यकर्ता हा व्यक्तीपेक्षा पक्षाला अधिक प्राधान्य देतो. विधान परिषदेचा पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे यंदाच्या पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केला. 

प्रचाराच्या निमित्ताने ते सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे उपस्थित होते. चरेगावकर म्हणाले, विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून मी देखील ईच्छुक होतो. परंतु मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज होणाऱ्यां पैकी कार्यकर्ता नाही. भाजपच्या पदवीधर व शिक्षकच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी पाचही जिल्ह्यात फिरत आहे. भाजप हा पार्टी विथ डिफरन्स पक्ष असल्याचे या निवडणुकीतून सर्वांना दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

राज्यातील सहकारी चळवळीमध्ये आतापर्यंत व्यक्तीपूजा झाली. त्यामुळे राज्यातील सहकार चळवळीची घसरण झाली. सहकार चळवळीत व्यक्तीपूजा पेक्षा संस्थेचे हित अधिक महत्त्वाचे असायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बिहारची निवडणूक होण्यापूर्वी प्रत्येक प्रचारसभेत भाजपचे बिहारमधील व केंद्रातील सर्वच नेते सांगत होते की बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार यांना विराजमान केले जाईल. जनतेसमोर भाजपने दिलेला हा शब्द पाळला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान मात्र भाजपने शिवसेनेला असा कोणताही शब्द दिला नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील नेते त्यावेळी हेच सांगत होते की " केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र', महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याचे त्यावेळी व्यासपीठावरन सांगण्यात आले. हे सांगत असताना त्यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरे हे देखील असायचे. त्यावेळी मात्र ते याबाबत काहीच बोलले नाहीत. भाजप जो शब्द देतो तो शब्द पाळतो असा आजपर्यंतचा इतिहास असल्याचेही शेखर चरेगावकर यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Charegaonkar believes BJP has more priority than candidate in BJP, BJP wins again from Pune graduates