राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेचाच बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा 

प्रशांत काळे 
Tuesday, 8 September 2020

मुबंईची तुलना पाकिस्तानबरोबर करणाऱ्या, राज्याला कमी लेखणाऱ्या कंगना राणावतवर गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात स्पष्ट केले असल्याचे आंधळकर यांनी सांगितले. 

बार्शी (सोलापूर) : फायनान्सचे कर्ज आम्ही भरणार नाही, शेतकऱ्यांप्रमाणे महिलांचे बचत गटाचे कर्ज माफ करावे, महिलांना कर्जमुक्त करा, वीज बिल कमी करा, रेशनचा तांदूळ परत द्या, जनावरांचा बाजार सुरु करा अशा घोषणा देत शेकडो महिलांनी येथील तहसील कार्यालयावर बुधवारी भर उन्हामध्ये मोर्चा काढला. शासनाने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा यावेळी इशारा देण्यात आला. दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, दीपक आंधळकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. भवानी पेठ येथून दुपारी बाराच्या दरम्यान शेकडो महिला एकत्र येऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढून तहसील कार्यालय येथे पोहचल्या. याप्रसंगी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, की कोविडच्या संसर्गामुळे देश लॉकडाउन झाला. मागील पाच महिने झाले, अनेकांचे रोजगार गेले, दोन वेळचे अन्न मिळण्याची भ्रांत आहे. अशा परिस्थीत खासगी फायनान्स कंपन्या नागरिकांना त्रास देत आहेत. शहरातील महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरावेत म्हणून फायनान्स कंपन्यांचे एजंट वसुलीचा तगादा लावत आहेत. अनेक सावकार घरात येऊन वसुलीची धमकी देत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले त्याच धर्तीवर महिला बचत गटाचे कर्जमाफ करुन कर्जमुक्त करावे. शहरातील एकही महिला बचत गट कर्जाचे हप्ते भरणार नाही. याबाबत ठराव करुन शासनाकडे दिला असून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाचे आदेश येईपर्यंत बचत गटाचे कोणतेही खाते एनपीएमध्ये टाकू नये, असे म्हटले आहे. सामान्य, गोरगरीब जनतेच्या तोंडातील रेशनचा तांदूळ पनवेल येथे काळ्या बाजारात विक्री केला जातो. तो तांदूळ परत बार्शीतील कुटुंबाना शासनाने द्यावा. मुबंईची तुलना पाकिस्तानबरोबर करणाऱ्या, राज्याला कमी लेखणाऱ्या कंगना राणावतवर गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात स्पष्ट केले असल्याचे आंधळकर यांनी सांगितले. यावेळी प्रहार संघटनेच्या संजिवनी बारंगुळे, संगीता पवार, ऍड .राजश्री डमरे, आप्पा पवार, दीपक आंधळकर, सुनिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारुन भावना शासनाकडे कळवण्यात येथील असे आश्वासन दिले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena which is in power in the state marched on Barshi tehsil office