सोलापुरात प्रथमच घरांमध्ये शिवमूर्तीची प्रतिष्ठापना (Video)

सुस्मिता वडतीले
Tuesday, 18 February 2020

उमानगरी येथे पिपाणी आणि संभळ या पारंपरिक वाद्याच्या तालात महिलांनी शिवमूर्तीची मिरवणूक काढली. भगवे उपरणे, हातात भगवा झेंडा या वेळी लक्ष वेधत होता. सोलापुरात दरवर्षी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवावेळी ज्याप्रमाणे अनेक घरांमध्ये वाजतगाजत मिरवणूक काढून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, अगदी त्याचप्रमाणे विजय पुकाळे यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

सोलापूर : "जय भवानी जय शिवाजी'च्या गजरात व फुलांची उधळण करत सोलापुरात यंदा प्रथमच अनेक घरांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 
उमानगरी येथे पिपाणी आणि संभळ या पारंपरिक वाद्याच्या तालात महिलांनी शिवमूर्तीची मिरवणूक काढली. भगवे उपरणे, हातात भगवा झेंडा या वेळी लक्ष वेधत होता. सोलापुरात दरवर्षी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवावेळी ज्याप्रमाणे अनेक घरांमध्ये वाजतगाजत मिरवणूक काढून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, अगदी त्याचप्रमाणे विजय पुकाळे यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. याप्रमाणे शहरातील काही घरांत मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. दोन दिवसांवर शिवजन्मोत्सव आला असल्याने चौकाचौकांत, शिवाजी पुतळा चौक, सात रस्ता, लष्कर, पूर्व विभाग यासह जुळे सोलापुरात मोठ्या उत्साहात विविध मंडळांकडून शिवमूर्तीची प्रतिष्ठपना झाली. यंदा घरांमध्येसुद्धा शिवमूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. 

गुलाबांची पुष्पवृष्टी 
सोलापूर शहरात प्रथमच हर्र...हर्र...महादेव, जय शिवाजी...जय भवानी असा जयघोष करत तसेच सनईचौघड्यांच्या सुरांनी, गुलाबांची पुष्पवृष्टी करीत शिवभक्तांनी गणेशोत्सवाप्रमाणे वाजत गाजत घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केली आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वंजण या सोहळ्यास तल्लीन झाले होते. घरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणल्यानंतर ओवाळणी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती महाराजांवर पुष्पवृष्टी झाली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याच पद्धतीने घरोघरी गौरी गणपतीची स्थापना केली जाते त्याचप्रमाणे यंदा घरोघरी शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रत्येकाने शिवाजी महाराजांप्रमाणे आपले आचारविचार ठेवले पाहिजेत. 
- वैजयंती कुलकर्णी 

यावर्षी अनेक घरांमध्ये गणेशोत्सवाप्रमाणे छत्रपती महाराजांची जयंती साजरी केल्यामुळे खरी जयंती साजरी केल्यासारखे वाटत आहे. प्रत्येक मुलांनी शिवाजी महाराजांसारखे घडले पाहिजे. घरोघरी शिवाजी जन्माला आले तर वारंवार होणारे अत्याचार कमी होतील. त्यामुळे महाराजांसारखे आचारविचार मनात ठेवले तर प्रत्येक घरात शिवाजी जन्माला येईल. 
- मनीषा मोरवंचीकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivamurti installed for the first time in Solapur homes