"शिवभोजन' आता तालुक्‍याच्या ठिकाणी 

प्रमोद बोडके
Monday, 30 March 2020

तमिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेशच्या कामगारांसाठी व्यवस्था 
राज्यात लॉकडाऊन/संचारबंदी/जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात तमिळनाडू येथील 150, राजस्थान येथील 210 आणि मध्य प्रदेशातील 264 कामगार वास्तव्यास आहेत. या कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. या कामगारांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य व फूड पॅकेट देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी असलेली शिवभोजन योजना आता तालुका पातळीवर सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिवभोजन योजना काही दिवस बंद करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. दुपारी 11 ते 3 या वेळेत आणि पाच रुपयांमध्ये ही योजना सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात तालुकास्तरावर 24 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
हेही वाचा - धक्कादायक! बालकामगार आणि बालगृहातील मुले उपाशीपोटी 
सोलापूर शहरात सध्या पाच ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) ही थाळी आता उपलब्ध होणार आहे. सोलापूर शहरातील शिवभोजन केंद्रासाठी असलेला प्रत्येकी 150 थाळींचा कोठा वाढविण्यात आला असून हा कोठा आता प्रत्येकी 175 एवढा करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन/संचारबंदी/जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना कोणीही उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. हा विस्तार करत असताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सामाजिक अंतर पाळण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. 
हेही वाचा - शिवभोजनामुळे सोलापुरातील 750 जणांना आधार 
सध्या सोलापूर जिल्ह्यासाठी शिवभोजन थाळीचा 700 एवढा कोठा देण्यात आला आहे. या कोठ्यात वाढ करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यासाठी आता 3500 थाळींचा कोठा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी एक किंवा दोन शिवभोजन केंद्र सुरू केली जाणार आहेत. या केंद्रासाठी 2 हजार 800 थाळींचा कोठा देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivbhojan now in the taluka place