श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीला कोट्यावधीचा फटका 

अभय जोशी 
Monday, 30 March 2020

एकीकडे मंदिर समितीला दररोजच्या पूजा आणि देणगीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. तर दुसरीकडे सद्यपरिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून मंदिर समितीकडून शहरातील 500 भिकारी आणि बेघरांना अन्नदान केले जात आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केली असल्यामुळे नेहमीप्रमाणे विठुरायाला देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून लोकांच्या मदतीला धावावे लागणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले असल्यामुळे नित्यपूजा, पाद्यपूजा, उन्हाळ्याच्या काळात केल्या जाणाऱ्या चंदनऊटी पूजा आणि देणगीच्या माध्यमातून श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर समितीला मिळणारे उत्पन्न पूर्ण थांबले असल्याने समितीला कोट्यावधी रुपयांचा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. 
एकीकडे मंदिर समितीला दररोजच्या पूजा आणि देणगीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. तर दुसरीकडे सद्यपरिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून मंदिर समितीकडून शहरातील 500 भिकारी आणि बेघरांना अन्नदान केले जात आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केली असल्यामुळे नेहमीप्रमाणे विठुरायाला देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून लोकांच्या मदतीला धावावे लागणार आहे. अशा परिस्थितीमुळे मंदिर समितीच्या अर्थकारणाला येत्या काही दिवसात मोठा फटका बसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून संसर्ग वाढू नये यासाठी 17 मार्च पासून येथील श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. 15 एप्रिल पर्यंत मंदिर बंद राहील असा अंदाज आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला दररोज होणाऱ्या एका नित्यपूजेच्या माध्यमातून 25 हजार, दररोज रात्री होणाऱ्या दहा पाद्यपूजा यांच्या माध्यमातून प्रत्येकी चार हजार रुपये याप्रमाणे 40 हजार असे एकूण 65 हजार रुपयांचे उत्पन्न बंद झाले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या चरणाजवळ तसेच मंदिरातील हुंडी पेटीत देणगी टाकली जाते. तेही उत्पन्न आता पूर्ण थांबले आहे. मागील वर्षी रंगपंचमी ते गुढीपाडवा या काळात 49 लाख आणि आणि त्यानंतरच्या चैत्री यात्रेच्या कालावधीत सुमारे 76 लाख रुपये असे एकूण या काळात सुमारे सव्वा कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा रंगपंचमी ते 17 मार्च रोजी मंदिर बंद होईपर्यंत केवळ 17 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. 

चंदन उटी पूजा होणार परंतु उत्पन्न शून्य... 
उन्हाळ्यात सुमारे 60 दिवसाच्या काळात श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची दररोज चंदन उटी पुजा केली जाते. श्री विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी 17 हजार आणि श्री रुक्‍मिणी मातेच्या उटी पूजेसाठी 8 हजार 500 रुपये देणगी मंदिर समितीकडून घेतली जाते. यंदा दररोज 3 पूजा केल्या जाणार होत्या. त्या माध्यमातून समितीला चंदन उटी पूजेच्या सुमारे 60 दिवसांच्या काळात दररोज सुमारे 75 हजार याप्रमाणे सुमारे 45 लाख रुपये मिळणार होते. आता प्रथेप्रमाणे दररोज सुमारे एक किलो चंदन उगाळून मंदिरातील कर्मचारी पुजाऱ्याच्या माध्यमातून चंदन उटी पूजा केली जात आहे परंतु पूजेच्या माध्यमातून मिळणारी देणगी मात्र मिळणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Vitthal Rukmini Temple Committee loss due to corona