करकंब येथे पुन्हा शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

बुधवारी एक रुग्ण बाधित आढळल्याने आज गावात कडक कर्फ्यू पाळण्यात आला. त्यामुळे मागील आठवड्याभरात सम-विषम तारखांचे नियोजन करून केलेले व्यवहार ठप्प होऊन पुन्हा एकदा बाजारपेठेत शुकशुकाट पाहण्यात आला.

करकंब (पंढरपूर, जि. सोलापूर) : मागील दोन महिन्यांपासून सुरक्षित असणारा पंढरपूर तालुका आणि ग्रामीण भाग पुणे-मुंबई येथील चाकरमाने गावाकडे ेयेत असल्याने कोरोनाच्या विळख्यात अडकू लागले आहेत. याचा फटका उपरीपाठोपाठ तालुक्‍यातील सर्वात मोठ्या करकंब गावाला बसला आहे.

बुधवारी एक रुग्ण बाधित आढळल्याने आज गावात कडक कर्फ्यू पाळण्यात आला. त्यामुळे मागील आठवड्याभरात सम-विषम तारखांचे नियोजन करून केलेले व्यवहार ठप्प होऊन पुन्हा एकदा बाजारपेठेत शुकशुकाट पाहण्यात आला.

दरम्यान, आज प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी करकंब येथे पाहणी केली. येथील तीनही मोठ्या माध्यमिक प्रशालांसह सर्व जिल्हा परिषदांच्या शाळा अधिग्रहित करण्याच्या सूचना सचिन ढोले यांनी यावेळी दिल्या. शिवाय करकंबपासून तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र तर सात किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कातील 30 जण आणि लो रिस्क संपर्कातील 30 जणांचे संस्थात्मक विलिगीकरण वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे यांनी दिली. यापैकी थेट संपर्कातील काहीजण पूर्वीपासून संस्थात्मक विलिगकरणात आहेत. कोरोनाबाधित रुग्णास पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, बाधित रुग्णाच्या राहत्या घराच्या परिसरात विषाणूबाधित औषधाची फवारणी करण्यात आली. करकंब येथे कोरोनाने प्रवेश केल्याने घाबरलेल्या अनेक कुटुंबानी आज गावठाणातून आपापल्या शेतात राहण्यासाठी स्थलांतर केल्याचे पाहण्यात आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shukshukat again at Karkamb