जुळे सोलापूरात सोमवारपासून  सिध्देश्वर चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा 

शाम जोशी
Saturday, 16 January 2021

दरवर्षी संस्थेच्या वतीने सिध्देश्वर महायात्रेनिमित्त सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाची क्रिकेट स्पर्धा आयपीएल धर्तीवर होणार असून 18 ते 25 जानेवारी दरम्यान सामने होणार आहेत. यासाठी सोलापुरातील 06 संघातील 14 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा जुळे सोलापूरच्या भंडारी मैदानावर होणार आहेत

दक्षिण सोलापूर (सोलापूर) ;  सिध्देश्वर महायात्रेनिमित्त श्री. सिध्देश्वर सोशल फाउंडेशनच्यावतीने श्री सिध्देश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन सोमवारी (ता.18) सकाळी साडेनऊ वाजता जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद मुस्तारे व कार्याध्यक्ष- विजयकुमार हत्तुरे यांनी दिली. 
दरवर्षी संस्थेच्या वतीने सिध्देश्वर महायात्रेनिमित्त सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाची क्रिकेट स्पर्धा आयपीएल धर्तीवर होणार असून 18 ते 25 जानेवारी दरम्यान सामने होणार आहेत. यासाठी सोलापुरातील 06 संघातील 14 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा जुळे सोलापूरच्या भंडारी मैदानावर होणार आहेत. स्पर्धतील विजेत्या संघास व उपविजेते संघास सिध्देश्वर चॅम्पियन ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. दररोज होणाऱ्या स्पर्धेत मॅन ऑफ दी मॅचमध्ये खेळाडूना ट्रॉफी देण्यात येणार आहे. मॅन ऑफ दी सिरिज खेळाडूला ट्रॉफी आणि आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याचे श्री. मुस्तारे यांनी सांगितले. 
स्पर्धेचे उद्‌घाटन सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त धनराज पांडे, संजय धनशेट्टी, उद्योगपती सुधीर खरटमल, आय.एम.एस. स्कूलचे संचालक अमोल जोशी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू, उदय डोके, अंपायर असोसिएशनचे प्रशांत बाबर उद्योगपती समीर लोडे, मनोरमा बॅंकेचे माजी अध्यक्ष संतोष सुरवसे, प्रांतिक सदस्य महेश निकंबे उपस्थित राहणार असल्याचे श्री.मुस्तारे यांनी सांगितले. 
स्पर्धेचा समारोप सोमवारी (ता.25) दुपारी साडेचार वाजता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाने होणार आहे. अध्यक्षस्थानी सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी  राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिध्देश्वर बॅंकेचे चेअरमन प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, श्री सिध्देश्वर पाटील, उद्योगपती बाबूराव घुगे, बसवराज (राजू) देशमुख, विद्या लोलगे, महेश भंडारी, सिध्देश्वर जोकारे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा संयोजन समिती म्हणून राजेश येमूल, दत्ता बडगु, प्रशांत शांवतुल हे काम पाहणार असल्याचे श्री. मुस्तारे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष रेवणसिध्द बिज्जरगी, सचिव विकास कस्तूरे, प्रसिध्दी प्रमुख विशाल कल्याणी उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddheshwar Champion Cricket Tournament from Monday in Solapur