सात वर्षांपासून मोफत "ब्लड ऑन कॉल योजना'! शहीद अशोक कामटे संघटनेचा दीड हजार रुग्णांना लाभ 

दत्तात्रय खंडागळे 
Thursday, 1 October 2020

शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेली मोफत "ब्लड ऑन कॉल' योजना सलग सात वर्षांपासून सुरू आहे. सात वर्षांत सांगोला, पंढरपूर, करमाळा, बार्शी, माळशिरस व अक्कलकोट तालुक्‍यातील 1428 रुग्णांनी याचा फायदा घेतला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक नीलकंठ शिंदे यांनी दिली.

सांगोला (सोलापूर) : शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेली मोफत "ब्लड ऑन कॉल' योजना सलग सात वर्षांपासून सुरू आहे. सात वर्षांत सांगोला, पंढरपूर, करमाळा, बार्शी, माळशिरस व अक्कलकोट तालुक्‍यातील 1428 रुग्णांनी याचा फायदा घेतला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक नीलकंठ शिंदे यांनी दिली. 

जागतिक रक्तदान दिनानिमित्त संघटनेचे संस्थापक श्री. शिंदे यांनी सांगितले, की शहीद अशोक कामटे संघटनेने रक्तदात्यांचा प्रवास खर्चही केला आहे. शंभर मोफत सेवा संघटनेने बजावल्यामुळे गतवर्षी देखील अनेक रक्तदाते स्वयंस्फूर्तीने तयार झाले आहेत. लाभ घेणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांनी या उपक्रमाला धन्यवाद दिले आहेत. अनेक वेळा गरजू रुग्णांना गटातील रक्ताची गरज भासते, अशा वेळी आवश्‍यक असणाऱ्या गटाचे रक्त वेळेत मिळत नाही. त्यासाठी वेळ व पैसा फुकट वाया जातो, तोपर्यंत रुग्णाचा जीव टांगणीला लागलेला असतो. या सर्व बाबींचा विचार करून शहीद अशोक कामटे संघटनेने 2013 पासून ही मोफत रक्त पुरवठ्याची योजना आखली. 

रुग्णांनी फोन करताच मोफत रक्त पुरवठा येथील संस्थेच्या रक्तदात्यांनी केला आहे. गतवर्षी 389 पुरुष व 69 स्त्री रुग्णांनी याचा मोफत लाभ घेतला आहे. यामध्ये मंगळवेढा, करमाळा, मोहोळ, सांगोला येथील रुग्णांचा समावेश आहे. ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी चालू आहे. हा उपक्रम पाहून 1321 रक्तदाते स्वतःहून रक्त देण्यासाठी व विविध गटांचे 45 रक्तदाते प्रत्येक दिवशी हजर असतात. कॉल आला की तत्काळ नियोजित ठिकाणी पोचतात. त्यांचा जाण्या-येण्याचा खर्च शहीद अशोक कामटे संघटना करते. रुग्णांना संपूर्णपणे मोफत रक्त पुरवठा केला जातो. पंढरपूरसाठी एका तासात; माढा, करमाळासाठी तीन तासांत रक्तदाते नियोजित ठिकाणी पोच होतात. रक्तदात्यांकडून सरळ रक्त घेणे मोठे खर्चिक असते म्हणून शहीद अशोक कामटे संघटनेच्या सर्व सदस्यांनी ही योजना मांडली व ती गेल्या सात वर्षांपासून चांगल्या प्रकारे चालू आहे. 

24 तास सेवा उपलब्ध 
ज्या व्यक्तीला रक्ताची आवश्‍यकता आहे, त्यांनी 9423327241, 9403452950 या भ्रमणध्वनी क्रमांकावर 24 तास 365 दिवस संपर्क साधू शकता, असे आवाहन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Significant contribution of Shaheed Ashok Kamte in blood donation