सीना नदीकाठची पूरस्थिती टाळता आली असती; प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव 

किरण चव्हाण 
Sunday, 25 October 2020

दरम्यान, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नारायण आल्हाट म्हणाले, सीना-कोळेगाव, चांदणी धरण व खासापुरी बंधारा या तीन ठिकाणाचे तसेच सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस यामुळे नदीत येणारा पाण्याचा विसर्ग मोठा होता. साधारणपणे पंधरा ऑक्‍टोबरच्या आसपास आपण बंधाऱ्याची दारे बंद करतो. त्यामुळे नदीवरील बंधाऱ्याची सगळीच दारे बंद केलेली नव्हती. नदीत येणारा विसर्गच मोठा असल्याने नदी पात्रात पाणी न बसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली. त्यात उघड्या असणाऱ्या दरवाजांमध्ये पुराबरोबर आलेले ओंडके, कचरा अडकल्याने पाणी जाणे बंद झाले. विसर्ग मोठा असल्याने सर्व दरवाजे उघडे असते तरी पाणी पात्राबाहेर आले असते. यामुळे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असे मला वाटत नाही. 

माढा (सोलापूर) : सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडल्याच्या सूचना मिळाल्यानंतर पाटबंधारे विभागाने माढा तालुक्‍यातील सीना नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याची दारे तातडीने उघडली असती तर सीना नदीकाठी मोठी पूरस्थिती निर्माण झाली नसती, असे मत संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 
श्री. साठे म्हणाले, की सिना नदीकाठचा दौरा करून आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की माढा तालुक्‍यातही सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होता. त्यामुळे सीना नदीला पाणी आले होते. त्यातच कोळेगाव धरणातून नदीत पंधरा हजार क्‍युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले होते. धरणातून नदीत पाणी सोडताना पूर ओढवण्याची शक्‍यता असल्याने प्रशासकीय पातळीवर समन्वय असतोच. कोळेगाव धरण व्यवस्थापनाने माढा तालुक्‍यातील पाटबंधारे विभागाला सुचित केले असणार. प्रशासकीय पातळीवरही सूचना मिळालेल्या असणार आहेत. त्यामुळे वरील धरणातून पाणी सोडल्याने पाटबंधारे विभागाने सीना नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याची दारे उघडायला हवी होती. असे केले असते तर कदाचित पूरस्थितीच निर्माण झाली नसती. अथवा त्याची तीव्रता खूप कमी जाणवली असती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानही टाळता आले असते. शासनालाही नुकसान भरपाई देण्याची वेळ आली नसती, असेही साठे म्हणाले. 
दरम्यान, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नारायण आल्हाट म्हणाले, सीना-कोळेगाव, चांदणी धरण व खासापुरी बंधारा या तीन ठिकाणाचे तसेच सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस यामुळे नदीत येणारा पाण्याचा विसर्ग मोठा होता. साधारणपणे पंधरा ऑक्‍टोबरच्या आसपास आपण बंधाऱ्याची दारे बंद करतो. त्यामुळे नदीवरील बंधाऱ्याची सगळीच दारे बंद केलेली नव्हती. नदीत येणारा विसर्गच मोठा असल्याने नदी पात्रात पाणी न बसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली. त्यात उघड्या असणाऱ्या दरवाजांमध्ये पुराबरोबर आलेले ओंडके, कचरा अडकल्याने पाणी जाणे बंद झाले. विसर्ग मोठा असल्याने सर्व दरवाजे उघडे असते तरी पाणी पात्राबाहेर आले असते. यामुळे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असे मला वाटत नाही. 

संपादन : वैभव गाढवे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The situation along the Seena River could have been avoided with a lack of coordination at the administrative level