"सैनिक हो तुमच्यासाठी !' माळीनगरच्या शिक्षकासह सहा रायडर्स मारणार चार हजार किलोमीटर सायकलिंगने जवानांना सॅल्यूट 

प्रदीप बोरावके 
Monday, 25 January 2021

हे सायकल रायडर्स कच्छमधील कोटेश्वर मंदिरापासून सायकलिंगला ते सुरवात करणार आहेत. कच्छ - पाकिस्तान सीमेवरील बीएसएफच्या जवानांना सॅल्यूट करून आंतरराष्ट्रीय सीमेवरून कच्छ आणि राजस्थानच्या मिठाच्या, वाळूच्या मैदानातून उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाम या भूमीतून ते पुढे ईशान्य भारतातील अरुणाचल लोहित दरीमध्ये हिमालय पर्वतातील अरण्यामधून किबीथूपर्यंत चार हजार किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर सायकलिंग करणार आहेत. 

माळीनगर (सोलापूर) : "सैनिक हो तुमच्यासाठी' (राईड फॉर द सोल्जर्स) या मोहिमेत महाराष्ट्रातील सहा जण कोटेश्वर मंदिर (कच्छ, गुजरात) ते किबीथू (अरुणाचल प्रदेश) असे चार हजार किलोमीटर सायकलिंग करणार आहेत. यामध्ये माळीनगरच्या मॉडेल विविधांगी प्रशालेतील शिक्षक राजेंद्र धायगुडे सहभागी होणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून 42 दिवसांच्या मोहिमेवर ते निघणार आहेत. 

गिरीश चिरपुटकर (वय 64, पुणे), राजेंद्र धायगुडे (वय 56, माळीनगर), रामेश्वर भगत (वय 63, मुंबई), अनंत धवले (वय 58, औरंगाबाद), पवन चांडक (वय 44, पनवेल), रमाकांत महाडिक (वय 66, ठाणे) हे या मोहिमेतील धाडसी वीर आहेत. नवीन वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे यांना नेहमीच आकर्षित करतात. ते आव्हान स्वीकारून सायकलवरून तेथे भेट देण्याचा यांना छंद आहे. सायकल पर्यावरण राखणारे व आरोग्यदायी वाहन असून त्यामुळे लोकांशी सहज संवाद साधता येतो. 

भारतात किबीथूला सूर्योदय सर्वात प्रथम होतो, तर कोटेश्वर येथे सूर्यास्त सर्वात उशिरा होतो. भारतात कच्छच्या बंजर पण सुंदर आणि अतिपूर्वेकडील अरुणाचलचा हिमालय पर्वतांनी, घनदाट जंगलांनी वेढलेला लोहित दरीचा भाग आहे. गुजरातमधील गुहार गावात कोटेश्वर मंदिर आहे. अरुणाचलच्या अंजाव जिल्ह्यात किबीथू गाव आहे. 

कच्छमधील कोटेश्वर मंदिरापासून सायकलिंगला ते सुरवात करणार आहेत. कच्छ - पाकिस्तान सीमेवरील बीएसएफच्या जवानांना सॅल्यूट करून आंतरराष्ट्रीय सीमेवरून कच्छ आणि राजस्थानच्या मिठाच्या, वाळूच्या मैदानातून उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाम या भूमीतून ते पुढे ईशान्य भारतातील अरुणाचल लोहित दरीमध्ये हिमालय पर्वतातील अरण्यामधून किबीथूपर्यंत चार हजार किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर सायकलिंग करणार आहेत. 

भौगोलिक परिस्थितीनुसार रोजचे साधारण 50 ते 150 किलोमीटर अंतर पार करीत महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देत ते 40 दिवसांत हेल्मेट टॉपला पोचणार आहेत. तेथे 1962 च्या चीन युद्धातील शहीद जवानांचे वॉर मेमोरियल आहे. शीख, कुमांउ, गोरखा आणि डोग्रा रेजिमेंटचे जवान अखेरच्या श्वासापर्यंत येथे लढून शहीद झाले होते. त्या मेमोरियलला हे सलाम करणार आहेत. हा प्रवास कोणतेही सपोर्ट वाहन न घेता ते करणार आहेत. 

सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत प्रवासातील देशबांधवांच्या जवानांप्रती असलेल्या भावना आम्ही पोचवणार आहोत. हेल्मेट टॉप येथील जवानांना तिरंगा ध्वज देऊन सलाम ठोकणार आहोत. 26 जानेवारीला मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहिमेस प्रारंभ होणार आहे. 
- राजेंद्र धायगुडे, 
माळीनगर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six riders with a teacher from Malinagar will bicycle four thousand kilometers