सोलापूर शहरात 23 जणांचे अलगीकरण VIDEO

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 24 मार्च 2020

नागरिकांना आवाहन 
कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजना अंतर्गत सो.म.पा. प्रशासनाकडून आवाहन करणेत येत आहे की , सोलापूर जिल्ह्याबाहेरुन जसे पुणे-मुंबई इ. शहरातून , परराज्यातून जसे तेलंगणा, कर्नाटक ,  बाहेरील देशातून येणाऱ्या  नागरिकांनी म.न.पा.च्या विभागीय कार्यालयांना संपर्क साधून माहिती देउन अथवा www.solapurcorporation.gov.in या म.न.पा.च्या संकेतस्थळावर होम पेजवर “सोलापूर जिल्ह्याबाहेरुन आलेल्या प्रवाशांनी स्वत:हून भरावयाची माहिती” या लिंकवर माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे. 
- दीपक तावरे, महापालिका आयुक्त 

 

 

सोलापूर : सोलापूर शहरात आज मंगळवारी 23 जणांचे अलगीकरण (होम कोरंटाईन) करण्यात आले आहे. महापालिकेच्या पथकाने परदेशातून आलेल्या या नागरिकांचा शोध घेतला असून, त्यांच्या हातावर शिक्केही मारले आहेत. 

दरम्यान, घरात अलगीकरण केलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी महापालिकेने 15 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. दरम्यान, हात धुण्यासाठी महापालिका शहरातील 100 ठिकाणी पाण्याची टाकी बसविणार आहे, अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी "सकाळ'ला दिली. या पथकाचे काम सुरु झाले असून पथकाने पहिल्या दिवशी 23 जणांचा शोध घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनेनुसार या पथकाची नियुक्ती केली आहे. विभागीय कार्यालयनिहाय घरात अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे व त्यांच्या कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम या पथकामार्फत केले जाणार आहे. या पथकामध्ये एक प्रमुख व त्यांना दोन सहायक अशी नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये डॉ. जगदीश काळे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. अरुंधती हराळकर, डॉ. आतिश बोराडे, डॉ. जयंती आडके यांचा समावेश असून ते पथकप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. 

हे पथक जिल्हाधिकरी मिलिंद शंभरकर आणि महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या अधिपत्याखाली व त्यांच्या सूचनेनुसार कार्यरत राहणार आहे. तसेच रोजच्या रोज कामकाजाचा दैनिक अहवाल आरोग्याधिकाऱ्यांकडे त्यांना द्यावा लागणार आहे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, अशी सक्त सूचना आयुक्तांनी काढलेल्या आदेशात करण्यात आली आहे. 

महापालिकेने केलेली व्यवस्था 
सोलापूर जिल्ह्याबाहेरून आलेल्या जसे पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक, तेलंगणा व परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या विभागीय कार्यालयात (झोन) कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.  त्यासाठी विभागीय कार्यालयानुसार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांची माहिती या प्रमाणे ः झोन एक (0217-2740370), झोन दोन (0217-2740371), झोन तीन (0217-2740372), झोन चार (0217-2740373), झोन पाच (0217-2740374), झोन सहा (0217-2740375),  झोन सात (0217-2740399) झोन आठ (0217-2740322)

सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांची भरती 
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सेवानिवृत्त झालेल्या 200 वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. 70 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 27 मार्चपर्यंत या तात्पुरत्या पदासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी 50, आरोग्य कर्मचारी 50 आणि परिचारीका 100 अशी संख्या आहे. 

चला पाहुया आयुक्तांनी दिलेली माहिती VIDEO

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur 23 people home corantine in solapur city