सोलापूर शहराच्या कुशीत लपलेय स्मृतीवन व सिद्धेश्वर वनविहारचे हिरवे कोंदण

अरविंद मोटे 
Thursday, 24 September 2020

सोलापूर शहराच्या कुशीतच लपलेलं हे कोंदण, सोन्याच्या अंगठीत हिरवा खडा दिसवा तसं शोभून दिसत आहे. वनखात्याने ते जपून ठेवलं आहे. स्मृती वन आणि सिद्धेश्‍वर वन विहाराच्या रुपाने शहरवासियांना ऑक्‍सिजन पुरवण्याचे काम करणारी ही दोन उद्याने म्हणजे सोलापूरकरांच्या प्राणवायुचा खजिनाच तर आहेच पण निसर्ग पर्यटनासाठीही एक हक्काचे ठिकाण आहे

सोलापूर : शहरं बहरली तशी जंगलाने, वनराईने अंग चोरून घेतलं. रानमाळावरील वृक्षवनराई कधी इंधनासाठी तर कधी लाकूडकामासाठी तोडली गेली आणि जंगले नामशेष झाली. विकासाच्या भस्मारसुरामुळे झाडं, वने आणि लतावेली पुढच्या पिढीला केवळ चित्रातच पाहावी लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, ही वेळ लांबवण्याचे कार्य स्मृतीवन व सिद्धेश्‍वर वनविहारने केले आहे. 

सोलापूर शहराच्या कुशीतच लपलेलं हे कोंदण, सोन्याच्या अंगठीत हिरवा खडा दिसवा तसं शोभून दिसत आहे. वनखात्याने ते जपून ठेवलं आहे. स्मृती वन आणि सिद्धेश्‍वर वन विहाराच्या रुपाने शहरवासियांना ऑक्‍सिजन पुरवण्याचे काम करणारी ही दोन उद्याने म्हणजे सोलापूरकरांच्या प्राणवायुचा खजिनाच तर आहेच पण निसर्ग पर्यटनासाठीही एक हक्काचे ठिकाण आहे. 

विजापूर रोडवर धर्मवीर संभाजीराजे तलावाच्या शेजारी जैवविविधतेने नटलेले हे स्मृती वन म्हणजे वनभोजनासाठी एक दिवशीय निसर्गसहलीसाठी पर्वणीच आहे. अनेकजणांनी आपल्या आप्तस्वकियांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी याठिकाणी वृक्षलागवडी केल्या आहेत. आज या ठिकाणी एक हजार ते बाराशे प्रकारची वृक्षसंपदा पाहायला मिळते. जुळे सोलापूर व विजापूर रोड परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मॉर्निंग वॉकसाठी हक्काची जागा आहे. याठिकाणी इको लायब्ररी, बालोउद्यान, अवकाश निरिक्षणगृह तसेच पक्षीनिरिक्षणासाठी लपणगृहाची सोय आहे. विविध पक्षांची, वृक्षांची माहिती व छायाचित्रे याठिकाणच्या निसर्ग परिचय केंद्रात पाहायला मिळतात. सुमारे 12 हेक्‍टर जमिनीवर पसरलेल्या या स्मृतीवनासाठी (स्व.) वासुदेव रायते (स्व.) बाबुराव पेठकर, तसेच निनाद शहा, भारत छेडा, बी.एस. कुलकर्णी यांनी पाठपुरावा केला. यांच्या पाठपुराव्यामुळे वन खात्याने शहराजवळ असूनही एका सुंदर उद्यानरुपाने स्मृतीवनाचे जतन व संवर्धन केले आहे. 
सोलापूर शहर पाहायला येणाऱ्या पाहुण्यांना आणि निसर्गप्रेमीसांठी एक दिवशीय सहलीसाठी, निसर्गभोजनासाठी विलोभनिय पर्वणी या स्मृतीवनाच्या रुपाने मिळते. 

सिद्धेश्‍वर वनविहार 
स्मृतीवनाच्या मानाने बराच मोठा विस्तार असलेले सिद्धेश्‍वर विनविहार विजापूर रोडवरील राजस्वनगर परिसरात आहे. या रखीव जंगलात अनेक प्रकारची वृक्षसंपदा बहरली आहे. राखीव जंगल असल्याने आत सर्वत्र प्रवेश दिला जात नाही. मात्र, येथील निसर्ग परिचय केंद्रापर्यंत सर्वांना जाता येते. येथे लहान मुलांसाठी छोटेसे बालोउद्यान आहे. सर्व परिसरात विविध वृक्षांनी बहरलेले वन आहे. या वनात अनेक पानवठे असून विविध फुलपाखरे, पक्षी मुक्त विहार करताना दिसतात. 210 हेक्‍टर इतका विशाल परिसर असलेल्या या राखीव जंगलात विविध प्रकारची वृक्षसंपदा लपलेली आहे. हे वन कडुनिंब, वड, पिंपळ, बोर, जांभूळ, चिंच, विलायती चिंच, करंवद, आवळा, सिताफळ, अर्जुन, कुसुम, गांदन, पळस याशिवाय अनेक प्रकाराच्या औषधी वनस्पतींने बहरलेले आहे. निसर्ग परिचय केंद्राभोवती पारिजात, टिकुमा, बकुळ, जास्वंद, कन्हेर सदाफुली अनेक फुलझाडे वन खात्याने लावलेली आहेत. या वनविहारात मोर, लांडोर, ससे, कोल्हे आदी प्राण्यांचा रविवास आहे. 
या दोन्ही ठिकाणी फुलपाखरांसाठी स्वतंत्र उद्याने असून माहिती देणारी छायाचित्रे फलक लावलेले आहेत. वनखात्याकडून यांचे जतन व संवर्धन होत आहे. गरज आहे ती परिसरात स्वच्छता राखण्याची व पर्यावणाचा ऱ्हास होणार नाही, असे प्लास्टिक, कचरा या परिसरात न टाकण्याची, ही जबाबदारी स्थानिक नागरिकांबरोबरचे याठिाकणी येणाऱ्यांचीही आहे. 

स्मृतीवनाबद्दल माहिती देताना विभागीय वनअधिकारी सुवर्णा माने म्हणाल्या की, बारा हेक्‍टरवर पसरलेल्या स्मृतीवनात विविध प्रकारच्या वृक्षांचे जनत व संवर्धन करण्यात आले आहे. 1996 पासून अनेकांनी आप्त स्वकियांच्या स्मृती प्रित्यर्थ याठिाकाणी वृक्ष लागवड केलेली आहे. वृक्षांच्या संवर्धनासाठी एक हजार रुपये स्मृतीवनास देणगी रुपाने दिले आहेत. आजही दरवर्षी अनेकजण वृक्षलागवड करतात, वन खात्याकडून येथील वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन करणे सुरू आहे. यापूर्वी वन खात्याने अनेक उपक्रम राबवून स्मृतीवन साकारले आहे. फुलपाखरांसाठी उद्यान, इको लायब्ररी असे अनेक उपक्रम सुरु ठेवले आहेत. 

सिद्धेश्‍वर वनविहारासाठी वनपाल चेतन नलावडे, शुभांगी कोरे आदी वन विभागाचे अधिकारी वनसंवर्धनसाठी प्रयत्न करत आहेत. येथे सुंदर रोपवाटीका आंबारोपन उपक्रम साकारले आहेत. रोपवाटीकेसाठी रामहरी निरवणे हे काम पाहतात. येथील वृक्षसंपदेबद्दल माहितीचा खजिना त्यांच्याकडे उपलब्ध आहे. 

कसे जाल 
स्मृतीवन : विजापूर रोड वरील छत्रपती संभाजी तलावाच्याबाजूने केटरींग कॉलेजच्या मागील बाजूने स्मृतीवनात जाण्यासाठी रस्ता आहे. किंवा आसरा पुलावरून डि मार्टपासून न्यू संतोष नगर मार्गेही जाता येते. 
सिद्धेश्‍वर वनविहार : विजापूर रोड वरील इंचगिरी मठासमोरून प्रतापनगर रस्त्याने सिद्धेश्‍वर वनविहारात जाता येते. 

महाराष्ट्र सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur beautiful monument and Siddhesh Vanvihar