खासदार डॉ. महास्वामींना जबाबासाठी पुन्हा बोलावणार ! बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी तलमोडच्या चौघांची चौकशी

तात्या लांडगे
Saturday, 6 March 2021

न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याची तयारी 
खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पोलिसांनी संशयितांकडून चौकशी केली आहे. आता त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पडताळणी सुरु केली आहे. काहींनी दिलेली माहिती खरी की खोटी, कोणी खोडसाळपणाने खोटी माहिती दिली आहे का, यादृष्टीने तपास सुरु आहे. सखोल चौकशी झाल्यानंतर न्यायालयात या प्रकरणाचा अहवाल (दोषारोपपत्र) सादर केले जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी बनावट जात प्रमाणपत्र दाखल केल्यावरुन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांची गुन्हे शाखेने सखोल चौकशी सुरु केली आहे. खासदारांच्या पहिल्या जबाबानंतर पोलिसांनी डिग्गी व तलमोड (ता. उमरगा) येथील काहीजणांची गुरुवारी (ता. 4) चौकशी केली. त्यापैकी चौघांना आज सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोलावून त्यांचाही जबाब नोंदविला. त्यानंतर आता खासदारांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार असून पुढील आठवड्यात त्यांचा जबाब होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याची तयारी 
खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पोलिसांनी संशयितांकडून चौकशी केली आहे. आता त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पडताळणी सुरु केली आहे. काहींनी दिलेली माहिती खरी की खोटी, कोणी खोडसाळपणाने खोटी माहिती दिली आहे का, यादृष्टीने तपास सुरु आहे. सखोल चौकशी झाल्यानंतर न्यायालयात या प्रकरणाचा अहवाल (दोषारोपपत्र) सादर केले जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर जात पडताळणी समितीने त्याची पडताळणी करुन तो दाखला अपात्र ठरविला. त्यानंतर त्यांनी अक्‍कलकोट तहसिलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी बनावट जात प्रमाणपत्राचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली असून अक्‍कलकोटमधील शिवसिध्द बुळ्ळा याला पकडून त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळविली. बुळ्ळा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिस तपासांत समोर आलेल्या बाबींनुसार गुन्हे शाखेने खासदारांचा जबाब घेतला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या पथकाने गुरुवारी (ता. 4) उमरगा तहसिल व उमरग्यातील डिग्गी आणि तलमोड येथील काहीजणांची चौकशी केली. तर पोलिसांनी उमरगा तहसिलमधून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur bjp MP Dr. Mahaswamy to be called back for enquire reply! at Talamod's four interrogated in fake caste certificate case