बारामतीसारखी छडी सोलापुरात नसल्यानेच.....

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 21 मे 2020

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामुळे देशात संगणक युग आले. डिजीटल इंडियाची मूळ संकल्पना ही राजीव गांधी यांचीच होती. त्यांच्यामुळे देशाने आज संगणकक्षेत्रात तसेच डिजीटल क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. राजीवजींची हत्या झालेल्या तिसऱ्या दिवशी आम्ही श्रीपेरमबद्दूरमध्येच होतो. हत्या झालेले स्थळाच्या परिसरात आम्ही जाऊन आलो होतो.
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, कॅंाग्रेस समिती, सोलापूर 

सोलापूर : शहरासंदर्भात धोरण राबविण्यासाठी बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे शक्तीशाली छडी आहे. तशी छडी सोलापूर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या स्थानिक नेत्यांकडे नाही. त्यामुळे महापालिकेत मनमानी कारभार सुरु आहे, अशी टीका कॅांग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त कॅंाग्रेस भवनात आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रमानंतर श्री. वाले बोलत होते. बारामतीमध्ये कोरोनासंदर्भात नियंत्रण करण्यात तेथील प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून उपाय योजना केल्या जात आहे. तशी स्थिती सोलापुरात नाही, असे विचारले असता श्री. वाले म्हणाले, सार्वजनिक आपत्तीवर मात करायची असेल तर त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग असणे आवश्यक आहे. सोलापुरात संसर्ग सुरु झाल्यापासून अनेक नगरसेवकांनी आपत्ती निवारणामध्ये नगरसेवकांचा सहभाग घ्यावा, अशी मागणी करत होते. मात्र प्रशासकीय यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. याउलट बारामतीमधील चित्र आहे. तेथील नेत्यांच्या हाती असलेल्या छडीचा धाक इतका आहे की ती उगारायची वेळच आली नाही. या नेत्यांनी केलेल्या सुचनेनुसार प्रशासनाने कार्यवाही केली, त्यामुळे साथ नियंत्रित राहीली.

ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपने जाहीर केलेले अंगण आंदोलन हे भाजप बचाअो आंदोलन आहे. संसर्ग झाल्यापासून भाजपचे किती लोकप्रतिनिधी नागरिकांना भेटले हा संसोधनाचा
विषय आहे. या उलट कॅंाग्रेसचे नगरसेवक सुरवातीपासूनच लोकांना मदत करणे, कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात जाऊन तेथील लोकांची चौकशी करणे ही कामे केली आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात डॅाक्टरांची बैठक सुरु होती, त्यावेळी स्थानिक आमदार त्या ठिकाणी आले आणि माझ्यामुळे खासगी दवाखाने सुरु झाले असे सांगण्यास सुरवात केली आहे. खोटं बोल पण रेटून बोल हे भाजपचे ब्रीदच आहे. त्यानुसारच त्यांचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कार्यरत आहेत, असेही श्री. वाले म्हणाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur congress city president statement news