स्वागतांच्या ताशांसोबतच कडाडली कॉंग्रेसमधील गटबाजी 

प्रमोद बोडके
Saturday, 10 October 2020

सुशीलकुमार शिंदे सोलापुरात असल्याने आले महत्व 
शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची मुदत पूर्ण झाली आहे. नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी अधूनमधून कॉंग्रेसमध्ये सातत्याने होत असते. माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या सोलापुरात आहेत. शिंदे यांच्यासमोर आपली झलक दाखविण्यासाठी वाले समर्थक व वाले विरोधकांनी प्रयत्न केल्याचे दिसत आहे. 

सोलापूर : ना कोणाला मंत्रीपद मिळाले, ना कोणाला विधानपरिषदेची लॉटरी लागली. तरी देखील कॉंग्रेस भवन आज सजले होते. कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलले होते. गेल्या अनेक वर्षांनंतर कॉंग्रेस भवनासमोर फटाके फुटले कशाचे? ढोल आणि ताशा वाजला कशाचा? असा प्रश्‍नच सर्वांना आज पडला होता. प्रत्येक जण विचारत होता, भाई क्‍या हुआ है. कोरोनामुक्त झालेल्या कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या स्वागतासाठी हा सारा खटाटोप होता. निमित्त होते वाले यांच्या स्वागताचे पण खरे उत्तर होते कॉंग्रेसमधील वाले यांच्या अंतर्गत विरोधकांना. 

शहराध्यक्ष वाले यांच्या स्वागताने विरोधकांना चोख उत्तर मिळाले असले तरीही स्वागताच्या जल्लोषाने सोलापूर शहर कॉंग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. शहराध्यक्ष वाले यांच्या स्वागतावर सुनील रसाळे यांनी आक्षेप घेतला. शहराध्यक्ष वाले यांनी स्वत:चे स्वागत करुन घेतले. हा फार विचित्रपणा झाल्याचे टिकास्त्र रसाळे यांनी सोडले. स्वागताच्या या संधीचे सोने करत प्रकाश वाले यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पक्षाची झालर चढविली. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचीच सत्ता आणण्याचा निर्धार त्यांनी कार्यकर्त्यांच्या साक्षीने व्यक्त केला. कोरोनावर मात करुन आता आपण नव्या उमेदीने, नव्या जोशाने कॉंग्रेस पक्षाच्या हितासाठी, जनतेच्या सेवेसाठी सज्ज झालो आहोत. सर्वांना सोबत घेऊन सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा यल्गारच त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur congress news