सोलापुरातील `त्या` मटन विक्रेत्याची साखळी हजारो ग्राहकांपर्यंत

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 20 मे 2020

या विक्रेत्याच्या कुटु्ंबातील सदस्यांना ताब्यात घेण्यात आले असून, नियमित ग्राहकांची अोळख निश्चित करून त्यांनाही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

सोलापूर - कोरोनाची लागण झालेल्या येथील मटन विक्रेत्याचा संबंध 300 ते 400  विक्रेत्यांशी आला असला तरी, त्यांच्या नातेवाईकांचेही मटन विक्रीचे दोन तीन दुकाने आहेत. या सर्वांची बोकड एकाच ठिकाणी कापली जात असल्याची माहिती पुढे आली असून, या सर्वांची मिळून संपर्काची साखळी अंदाजे  हजारो ग्राहकांपर्यंत असल्याने शहराच्या बहुतांश भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

या विक्रेत्याकडे केवळ मोरारजी पेठ परिसरच नव्हे तर शहराच्या अनेेक भागातून ग्राहक मटन घेण्यासाठी येतात. अगदी पूर्व भागातील अनेक नगरांपासून ते आसपासच्या ग्रामीण भागातील ग्राहकांचीही या दुकानदाराला पसंती आहे. त्यामुळे या दुकानदाराकडे मटन खरेदीसाठी कायम गर्दी असते. तसेच त्याच्या नातेवाईकाच्या दुकानातही कायम गर्दी असते. या दुकानदाराला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता या सर्वच दुकानात येणाऱ्या ग्राहकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. 

या विक्रेत्याच्या कुटु्ंबातील सदस्यांना ताब्यात घेण्यात आले असून, नियमित ग्राहकांची अोळख निश्चित करून त्यांनाही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

या विक्रेत्याकडे शहराच्या विविध भागातील नागरिक येतात. त्यामुळे ग्राहकांची साखळी मोठी असण्याची शक्यता आहे. त्या सर्वाची माहिती घेऊन सर्वांचीच तपासणी करावी. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. तशी सूचना महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांना केली आहे. 
- देवेंद्र कोठे, प्रभागाचे नगरसेवक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona mutton seller news