कोरोना योध्याचे  आत्मबल वाढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे  आंदोलन  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना राज्यभर आंदोलन करून भाजप फक्त स्टंटबाजीसाठी आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा आम्ही निषेध करत असल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.

सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्र, देश कोरोनाच्या विरुद्ध लढत असताना  भारतीय जनता पार्टीच्यावतीने  आज  आंदोलन करण्यात येत आहे . भाजपच्या या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी  व कोरोना योद्ध्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी  सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज  पक्ष कार्यालयात  आंदोलन करण्यात आले. 

 कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या संबंध वैद्यकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा, सफाई कामगार, आशा वर्कर्स व जगाचा पोशिंदा बळीराजा यांच्या सन्मानार्थ व त्यांना पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय ध्वज हातात धरून "मी राष्ट्रा सोबत मी महाराष्ट्रा सोबत" ह्या उद्घोषणासह शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेचे सर्व नियम पाळत तसेच सोशल डिस्टन्स ठेवत सोलापूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला शहराध्यक्ष सौ. सुनीता रोटे, सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी एक तास पाठिंबा दर्शविला.

कोरोना विषाणूच्या विरोधात जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, शेतकरी असे विविध घटक संघर्ष करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना राज्यभर आंदोलन करून भाजप फक्त स्टंटबाजीसाठी आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा आम्ही निषेध करत असल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona ncp news