esakal | सोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे 48 हजार तर शिक्षकचे 12 हजार मतदार 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक 
पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात अद्यापही पदवीधरचा आमदार करण्यात राष्ट्रवादीला यश मिळालेले नाही. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गटबाजीचा मोठा फटका बसत असल्याचे आतापर्यंतच्या निवडणुकीतून समोर आले आहे. यंदाच्या निवडणुकीत गटबाजी टाळण्यासाठी आणि सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्वीपासूनच चाचपणी सुरु केली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे 48 हजार तर शिक्षकचे 12 हजार मतदार 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे 48 हजार 324 तर शिक्षकचे 12 हजार 277 मतदार आहेत. या मतदारसंघातील निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

प्राप्त अर्जाची छाननी 13 नोव्हेंबरला होणार असून अर्ज माघार घेण्यासाठी 17 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघासाठी 1 डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला या दोन्ही जागांसाठी मतमोजणी होणार आहे. आमदारकीची निवडणूक अवघ्या एक महिन्यावर आली असल्याने इच्छुकांची लगबग आता सुरू झाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदारकी दत्तात्रय सावंत यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याकडे होती. दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. 

पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून सोलापूर जिल्ह्यातील श्रीमंत कोकाटे, उमेश पाटील या दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून शेखर चरेगावकर, कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या प्रशासकिय तयारीचा आढावा घेण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आहे.