डोळ्यासमोर दिसतंय पाणी, विजेअभावी  होरपळतोय सीनाकाठचा शेतकरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

शेतकरी सध्या अनेक संकट झेलत आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याचा प्रश्‍न तर आहेच, याशिवाय अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाले आहेत. ट्रान्स्फॉर्मर टाकण्यासाठी आवश्‍यक असलेले ऑइल उपलब्ध होत नाही. ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करणारे कामगार उपलब्ध नाहीत. यासह अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. जिल्हा प्रशासनाने या समस्यांवर तोडगा काढावा, यासाठी मी स्वतः उद्या (सोमवारी) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडणार आहे. 
- दिलीप माने, माजी आमदार, सोलापूर 

सोलापूर : फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेली अवकाळी, त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट, कोरोना रोखण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाउन, अशा एक ना अनेक संकटांना तोंड देणारा शेतकरी आता सुलतानी आणि अस्मानी संकटांचा सामना करत आहे. उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत डोळ्यासमोर दिसत आहे. हे पाणी पिकांना देण्यासाठी वीज नसल्याने बळिराजाला त्याच्या पिकांची होणारी राखरांगोळी पाहावी लागत आहे. 
विजेचा अपुरा पुरवठा या नवीन एका संकटाचा सामना सीना नदीकाठचा शेतकरी करत आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रयत्नातून उजनीचे पाणी पाकणी येथून सीना नदीत सोडण्यात आले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमध्ये द्राक्ष, खरबूज, कलिंगड उत्पादक शेतकरी भाव नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडला. ऊसउत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात दोन पैसे हाताला मिळतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात असलेल्या 44 ते 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाने पिकांची तहान वाढली आहे. ही तहान भागविण्यासाठी नदीत पाणी आहे, परंतु वीज नाही. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सीना नदीकाठच्या गावांना फक्त दोन तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याने नदीत असलेले पाणी शेतातील जळणाऱ्या पिकांना देऊ शकत नाही, हे दाहक वास्तव आहे. लॉकडाउन, दुष्काळ, अवकाळी अशा अनेक संकटांचा सामना केलेल्या शेतकऱ्यांना आता जिल्हा प्रशासनाने भक्कम आधार देण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी नदीकाठच्या गावांना मुबलक वीजपुरवठा करण्याची आवश्‍यकता आहे. 

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या हद्दीत सीना नदीत पाणी आहे, परंतु पिकांना पाणी देण्यासाठी वीज नाही. सध्या फक्त दोन तासच वीजपुरवठा दिला जात आहे. त्यामुळे नदीत पाणी असून देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांची पिके जळत आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आता असलेल्या पिकांचे नुकसान टाळावे. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत, त्याचा उदरनिर्वाह चालावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा. 
- अरविंद जाधव, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur district farmers problems