"निर्यातक्षम केळी उत्पादनात सोलापूर जिल्हा अग्रेसर, मात्र शेतकऱ्यांनी बदलावी मानसिकता !' 

सुहास कांबळे 
Wednesday, 6 January 2021

सध्या जगात निर्यातक्षम केळी उत्पादनात महाराष्ट्रातील जळगाव याबरोबरच उत्कृष्ट दर्जाची निर्यातक्षम केळी उत्पादनात सोलापूर जिल्हा अग्रेसर असून, केळी उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील (व्हाईस प्रेसिडेंट जैन इरेगेशन लि. कंपनी जळगाव) यांनी केले. 

पिंपळनेर (सोलापूर) : सध्या जगात निर्यातक्षम केळी उत्पादनात महाराष्ट्रातील जळगाव याबरोबरच उत्कृष्ट दर्जाची निर्यातक्षम केळी उत्पादनात सोलापूर जिल्हा अग्रेसर असून, केळी उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील (व्हाईस प्रेसिडेंट जैन इरेगेशन लि. कंपनी जळगाव) यांनी केले.

टेंभुर्णी येथे शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. के. बी. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन इरिगेशन सोलापूर जिल्हा ऍग्रोनॉमिस्ट किरण पाटील होते. 

डॉ. के. बी. पाटील पुढे म्हणाले, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी जी प्रक्रिया करावी लागते, त्या प्रक्रिया नियोजनासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. सध्या सोलापूर जिल्ह्यात ऊस पिकाबरोबरच केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. येथे निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्यामुळेच जागतिक बाजारपेठेत निर्यातक्षम केळी उत्पादनात जळगावाबरोबरच सोलापूर जिल्ह्यानेही अव्वल स्थानी मजल मारली आहे. मात्र त्यासाठी सातत्यता, प्रयोगशीलता व परिश्रमाची जोड हवी आहे. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन कंपनीचे अधिकृत विक्रेते सचिन डोके यांनी परिश्रम घेतले. प्रारंभी डॉ. पाटील यांचे पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. नूतन पदाधिकाऱ्यांचा डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष धनंजय मोरे, उपाध्यक्ष गणेश पोळ, सचिव सुहास कांबळे, खजिनदार गणेश स्वामी, संतोष वाघमारे, सय्यदअली जकाते, राजेंद्र केदार, रोहिदास साळुंखे, प्रगतशील शेतकरी अरुण पवार (श्रीपूर), उदया यादव (महाळुंग), धनाजी महाडिक (अकोला), पटवर्धन डोके आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur district is a leader in exportable banana production