
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक सातरस्ता येथील नियोजन भवनात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे कपात झालेला निधी, उशिरा प्राप्त झालेला निधी यावर चर्चा सुरु झाली.
सोलापूर : कोरोनाचे संकट आले आणि विकास निधीमध्ये कपात झाली. 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीपैकी फक्त 11 टक्केच निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. निधी आहे परंतु खर्च करण्यास कालावधी कमी आहे. 60 दिवसांमध्ये (मार्च अखेरपर्यंत) 90 टक्के निधी कसा खर्च करणार? असा प्रश्न माजीमंत्री आमदार सुभाष देशमुख यांना पडला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता हा निधी झेडपीला वर्ग करण्याचा सल्ला दिला. हा निधी वर्ग झाल्यास वर्षभर हा निधी वापरता येईल, असे सांगून विकासकामातील अनुभवाची चुणुकूच त्यांनी दाखवून दिली.
सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक सातरस्ता येथील नियोजन भवनात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे कपात झालेला निधी, उशिरा प्राप्त झालेला निधी यावर चर्चा सुरु झाली. आतापर्यंत फक्त 11 टक्के म्हणजे 44 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. खर्च कमी झाल्यावरुन आमदार देशमुखांनी प्रश्न उपस्थित केला. सोलापूर जिल्ह्याने 11 टक्के निधी खर्च करुनही सोलापूर जिल्हा राज्यात नंबरवन असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी सभागृहात दिली.
प्रत्येक जिल्ह्यासाठी गेल्या वर्षी देण्यात आलेल्या निधीतून दहा टक्के निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तर पाच टक्के निधी अतिवृष्टीसाठी वर्ग करण्याची हालचाल सुरु झाल्याचे खरे आहे का? असा प्रश्न आमदार बबनदादा शिंदे यांनी पालकमंत्री भरणे यांना केला. पालकमंत्री भरणे यांनी निधी वर्गच्या हालचालींना दुजोरा देताच हा निधी तातडीने झेडपीला देण्याची मागणी आमदार शिंदे यांनी केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पंढरपूर आणि सांगोला तालुक्यासाठी असलेल्या पाणी पुरवठा योजना भीमानदीवरील ज्या कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्यावर आहेत. तो बंधाराच ना दुरुस्त आहे. पाणी साठवणार कसे? असा प्रश्न आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित केला. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील सीना, माण आणि भीमा नदीवरील बहुतांश बंधाऱ्यांची अशीच स्थिती असल्याचे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लागावीत यासाठी तातडीने सोमवारी (ता. 25) पुण्यात बैठक घेण्याचे ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे ठरले. आमदार परिचारकांमुळे जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीचा विषय सभागृहात चव्हाट्यावर आला.
उमेश पाटलांनी मांडला अतिवृष्टीच्या भरपाईचा मुद्दा
जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना कमी रक्कम मिळाली आणि ज्यांचे शेत नदीपासून दहा ते पंधरा किमीवर आहे, त्यांना अधिक भरपाई मिळाली. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पंचनाम्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील यांनी केला. पंचनाम्यांमध्ये निष्काळजीपणा झाल्याने नुकसानग्रस्तांना कमी भरपाई मिळाली. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी उमेश पाटील यांनी केली.
अपडेट आमदार संजय शिंदे
बंधारे दुरुस्तीसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले. पुढील 15 दिवस जलसंपदा मंत्री जयंत पाटील दौऱ्यावर असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी सभागृहात दिली. त्यामुळे ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लावावी का? यावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री पवार यांची वेळ घेऊन ही बैठक तातडीने लावण्याचे निश्चित झाले आहे.