पावसाने आणले दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी (Video)

Solapur district received rain the next day
Solapur district received rain the next day

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अक्षरश: शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शनिवारी मध्यरात्री सोलापूरसह बार्शी, माढा, मोहोळ येथे जोरदार पाऊस झाला. रविवारी (ता. 1) सायंकाळी सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, करमाळा तालुक्‍यांत ढगांच्या गडगडाटासह पावसाने धुमाकूळ घातला. 
सलग दोन वर्षे दुष्काळातून सावरत असताना मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके चांगली आली. मात्र, याही वेळी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता ज्वारी, गहू, हरभरा काढण्याचा हंगाम सुरू असताना पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे उघड्या डोळ्याने नुकसान पाहण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. ज्वारीचे कोठार अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी ज्वारी काढून ठेवली आहे. काही ठिकाणी कणसांची मोडणी केली तर काही ठिकाणी ती शेतात तशीच पडून आहेत. पावसामुळे कडबा आणि कणसांचे नुकसान होणार आहे. गहू काढणीला आला असून पावसाने नुकसान झाले आहे. 

पावसाने गहू, ज्वारी, हरभरासह द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. "सकाळ'चे बातमीदार दावल इनामदार म्हणाले, मंगळवेढा तालुक्‍यात रविवारी (ता. 1) सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाने सुरवात केली आहे. यातून ज्वारी, करडा, हरभरा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. उमेशकुमार महाजन म्हणाले, सांगोला तालुक्‍यातील महूद परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तिसंगी येथील संजय हेगडे म्हणाले, परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अण्णा काळे म्हणाले, करमाळा तालुक्‍यात शनिवारी रात्री काही ठिकाणी थोडा पाऊस झाला, मात्र रविवारी केत्तूरसह अन्य भागांत पाऊस झाला आहे. विजेच्या कडकडासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. प्रशांत काळे म्हणाले, बार्शी तालुक्‍यात शनिवार आणि रविवार दोन दिवस पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. कुलभूषण विभूते म्हणाले, वैराग परिसरात विजेच्या कडकडाटासह सुमारे तासभर पावसाने धुमाकूळ घातला. यातून द्राक्ष, ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्‍यात पाऊस झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com