सिडनीत झळकणार सोलापूरची पताका 

अलताफ कडकाले
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

सोलापूर : मायक्रोसॉफ्टतर्फे शिक्षकांसाठी जागतिक पातळीवर आयोजिलेल्या शिक्षण परिषदेसाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती (पिरळे) येथील तंत्रस्नेही शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या शिक्षण परिषदेत जगभरातून आलेले तंत्रस्नेही शिक्षक आपले प्रबंध मांडणार असून यात सोलापूर जिल्ह्यातून शिवगुंडे यांना ही संधी मिळाली आहे. 

सोलापूर : मायक्रोसॉफ्टतर्फे शिक्षकांसाठी जागतिक पातळीवर आयोजिलेल्या शिक्षण परिषदेसाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती (पिरळे) येथील तंत्रस्नेही शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या शिक्षण परिषदेत जगभरातून आलेले तंत्रस्नेही शिक्षक आपले प्रबंध मांडणार असून यात सोलापूर जिल्ह्यातून शिवगुंडे यांना ही संधी मिळाली आहे. 

हेही वाचा- शिवभोजननंतर पंढरपुरात आता भाजपची दीनदयाळ स्थाळी

मायक्रोसॉफ्टतर्फे जागतिक शिक्षण परिषद 
मायक्रोसॉफ्ट जगभरावर आधिपत्य गाजविणारी एक कंपनी असून या कंपनीने आता शैक्षणिक क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून मायक्रोसॉफ्टतर्फे दरवर्षी जागतिक पातळीवर एक शिक्षण परिषद आयोजित केली जाते. या वर्षी ही शिक्षण परिषद ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 23 ते 26 मार्च दरम्यान आयोजित केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे देशभरातील शिक्षकांसाठी एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेसाठी महाराष्ट्रातून 10 शिक्षकांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक देशात अशी परिषद आयोजन करून यातील सहभागी शिक्षकांची निवड करून त्यांना मायक्रोसॉफ्ट जागतिक पातळीवरील शिक्षण परिषदेस निमंत्रित करते. या वर्षी भारतातून 25 मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर्स आणि तीन फेले एज्युकेटर्सना सिडनी येथे निमंत्रित करण्यात आले आहे. 13 डिसेंबरला सिडनी येथे झालेल्या शिक्षण परिषदेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये सोलापुरातून शिंदेवस्ती (पिरळे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांची निवड करण्यात आली.

 

अनेकविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविते 
सुप्रिया शिवगुंडे उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षिका असून दरवर्षी शालेय, जिल्हा, जागतिक स्तरावरील अनेकविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. फ्लिपग्रीड, माईनक्राफ्ट, वेकलेट, काहूत, स्काईप इन द क्‍लासरूम यासारख्या विविध शैक्षणिक टूल्सचा त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनात उपयोग करतात. त्यांनी गेल्या शैक्षणिक वर्षात फ्लिपग्रीड स्टडी बुक्‍स बनवून त्यामध्ये अभ्यासक्रमाला क्‍यूआर कोड चिकटवले. या कोडद्वारे विद्यार्थी अध्ययन करतात. आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सबमिट करतात हे विशेष. त्यांच्या या उपक्रमाची दखल फ्लिपग्रीडने घेतली असून मुलांसाठी अनेक बक्षिसे पाठवली आहेत. 

स्काईपद्वारे इतर शाळांशी संपर्क 
स्काईप लेसन मी बनविले असून याद्वारे जगभरातील शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. तसेच, स्काईपद्वारे इतर शाळांशी संपर्क साधून मुलांचे भावविश्‍व रुंदाविण्याचा प्रयत्न केला. शिंदे वस्तीसारख्या छोट्या वस्तीशाळेतील शिक्षिकेची दखल मायक्रोसॉफ्टने घेतली, याचा अभिमान वाटतो. सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, माळशिरस तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी नकाते, मुख्याध्यापक शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. 
- सुप्रिया शिवगुंडे, तंत्रस्नेही शिक्षिका, 
जि. प. शाळा शिंदेवस्ती, माळशिरस  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur flag to be spotted in Sydney