मोदीसाहेब आधी आम्हाला घर द्या... कोणी केलीय मागणी वाचा

Solapur Labour crisis in corona virus problem
Solapur Labour crisis in corona virus problem

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असलेल्या नागरिकांना बसत आहे. कामाच्या शोधात आलेल्यांचा यातून पोट भरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची भीती तर आहेच, पण काम नाही ना खायला नाही, त्यामुळे जगायचं कसं, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न निर्माण झाला आहे. चार बांबू उभा करून त्यावर कागद टाकून तयार केलेल्या झोपडीत असल्या उन्हात राहावं लागत असून अजून किती दिवस असे काढायचे हेच समजत नसल्याचे ते म्हणत आहेत. घरातच बसून राहिचे आहे, तर मोदीसाहेब आधी आम्हाला घर द्या... असं येथील कामगार महिला म्हणत आहेत. 
कामाधंद्याच्या शोधात अनेक नागरिक फक्त पुणे आणि मुंबईलाच जातात असे नाही, तर ते सोलापुरातसुद्धा वेगवेगळ्या भागांतून आलेले आहेत. असेच सुमारे 200 कामगार जळगाव जिल्ह्यातून आले आहेत. जगभर थैमान घातलेला कोरोना व्हायरस भारतातही हातपाय पसरत आहे. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून सरकारने संचारबंदी लागू केली. नागरिकांच्या फिरण्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे अनेक कामगार घरांपासून दूर अडकले आहेत. त्यांच्या मनात कोरोनाची तर भीती आहेच शिवाय काम बंद पडल्याने जगायचे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एसटी, रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे घरीही जाता येत नाही. "सरकार घरात बसा असं म्हणत आहे, पण बसायला घर तरी नको का', असा प्रश्‍न करत सुनीता जाधव यांनी मनातील भावनेला "सकाळ'शी बोलताना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, रस्त्याची कामे करण्यासाठी आम्हाला येथे आणले होते. पण सध्या ठेकेदार पळून गेला आहे. एकाने आम्हाला तांदूळ दिले होते. आता तेही संपले. 15 दिवस झालं एक एक दिवस पुढे ढकलत आहोत. पोरांनी झोपायचे कुठे? कोरोनाच्या भीतीने साधं पाणीसुद्धा आम्हाला भरू दिले जात नाही. आम्हाला गावीही घर नाही आणि येथेही घर नाही. प्रमिला चव्हाण म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला आधी घर द्यावे, मग घरात बसवावे. आम्हालाही जीव आहे. कोरोनासाठी उपाययोजना केली खरी, पण आमचं काय? लेकर उपाशी मारायची का? घरी जायचे तर गाडी नाही, येथे राहायचे तर पाणी नाही, अन्‌ खायालाही नाही. जळगावला आमची जागा आहे पण, घर नाही. तिथेही असचं झोपड्या लावून राहतोत आम्ही. दिवसभर लहान लेकरं घेऊन आम्ही रस्त्याची कामे करतो. आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आशा मोहिते म्हणाल्या, पाण्याला जातो आम्ही पण आता पाणी सुद्धा घेऊ दिले जात नाही. जेवढे पैसे होते तेवढे संपले. जेवढं काम होईल तेवढेच पैसे मिळतात आम्हाला. 

तीन वर्षांपासून वास्तव्य 
सोलापूर-पुणे महामार्गावर शिवाजीनगर येथे सोलापूरकडे येताना डाव्या हताला निळ्या, पिवळ्या व पांढऱ्या रंगाच्या कागदाच्या सुमारे 15-20 झोपड्यांचे एक छोटसं गाव लक्ष वेधते. सध्या सर्व कामे बंद असल्याने त्यांचे जगणे अवघड झाले आहे. गाड्या बंद असल्याने त्यांना गावाकडेही जाता येत नाही. कोरोनाची भीती त्यांच्याही मनात आहेच. त्याला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेमध्ये आमच्यावर उपासमारीची वेळ असल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त केला आहे. 
 
"सकाळ'च्या माध्यमातून मदत 
जळगाव येथील कामगारांनी "सकाळ'कडे व्यथा मंडल्यानंतर जयहिंद फूड बॅंकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी यांच्याशी संर्पक साधला. त्यानंतर काही वेळातच तेथील नागरिकांना मदत करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com