
फोन पे ऑपरेट करा, असे सांगून अनोळखी व्यक्तींनी बॅंक खात्यातून 79 हजार 28 रुपये काढून घेऊन फसवणूक केली.
सोलापूर : फोन पे ऑपरेट करा, असे सांगून अनोळखी व्यक्तींनी बॅंक खात्यातून 79 हजार 28 रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याबाबत संजय शिवाजी भोसले (वय 46, रा. निखिल थोबडे नगर, वसंत विहार, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय भोसले यांनी त्यांच्या ओळखीच्या एका दुकानातून स्टार्टर पेटी व केबल असे साहित्य खरेदी केले होते व त्याचे पैसे ऑनलाईन फोन पे केले. हे पैसे मिळाले नाहीत, म्हणून दुकानदाराचा फोन आल्यानंतर भोसले यांनी फोन पे कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर समोरून फोन आल्यावर तक्रार केली. त्यावेळी फोन पे ऍप ऑपरेट करा, असे सांगितल्यावर त्यांनी फोन पे ऑपरेट केले असता त्यांच्या खात्यातून 79 हजार 28 रुपये कट झाले. अशाप्रकारे त्यांची फसवणूक करण्यात आल्याची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सहायक फौजदार सय्यद तपास करीत आहेत.
हे ही वाचा : अपक्ष आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, बार्शीच्या विकासासाठी घेणार शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट !
गेंट्याल चौक परिसरात घरफोडी
उत्तर सदर बझार परिसरातील गेंट्याल चौकातील सत्य साई नगर येथील बंद घर फोडून चोरट्याने सोन्याची दागिने व रोख रक्कम असा 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत राजेंद्र सरेंद्रसा कोडमूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र कोडमूर हे घराला कुलूप लावून कर्नाटकातील गावी लग्नासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ड्रॉव्हरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्क्म चोरून नेल्याची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हवालदार मडवळी तपास करीत आहेत.
हे ही वाचा : नियमांचे पालन करु, सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला परवानगी द्या
लोकमंगल विहारमध्ये 79 हजारांची चोरी
बाळे परिसरातील लोकमंगल विहारमधील बंद घर फोडून चोरट्यांनी 78 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत इंद्रकुमार गोपाळराव जळभोगे (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळभोगे त्यांच्या सासूचे निधन झाल्याने कुटुंबासह घोमशी गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, गॅस सिलिंडर, एलईडी टीव्ही, रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. हवालदार शेख तपास करीत आहेत.
सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
15 लाखांसाठी विवाहितेचा छळ
घर घेण्यासाठी 15 लाख रुपये माहेरून आणावेत, म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह पाचजणांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सपना महेश कटकधोंड (वय 28, रा. पन्हाळा अपार्टमेंट, किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ, आसरा चौक, सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरुन पती महेश कटकधोंड, सासरे शिवशरण कटकधोंड, सासू प्रभावती कटकधोंड, दीर दिनेश कटकधोंड, नणंद जयश्री कटकधोंड (सर्व रा. हितेश अपार्टमेंट, सनग्रेस स्कूलजवळ, हिमालय सोसायटी, घाटकोपर, मुंबई) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नामध्ये अपेक्षेप्रमाणे वस्तू दिल्या नाहीत. तसेच घरासाठी 15 लाख रुपये सपनाने आणावेत, म्हणून तिचा छळ केला, अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. हवालदार घुगे तपास करीत आहेत.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी ई -सकाळचे ऍप डाऊनलोड करा
वाहतूक शाखेकडून 151 वाहनधारकांवर कारवाई
सोलापूर शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील विजापूर रोड व पुणे महामार्गावर इंटरसेप्टर वाहनातील कॅमेऱ्याद्वारे भरधाव जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुणे महामार्गावर 131 कार आणि दुचाकी तसेच विजापूर रोडवरील अत्तार नगर येथे 20 वाहनांवर ओव्हरस्पीड, हेल्मेट नसणे अशा कलमांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी कारवाई दररोज करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त दीपाली धाटे यांनी सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले