कर्फ्यूतील भ्रमंती : माणसाने माणसाशी माणसाम वागणे..

संजय पाठक 
शनिवार, 28 मार्च 2020

कर्फ्यूतील भ्रमंती सुरू झाल्यापासून माझ्या दृष्टीस एक गोष्ट वारंवार दिसायची, ती म्हणजे काही नागरिक वारंवार कर्फ्यू तोडून रस्त्यावर येण्याच प्रयत्न करत होते, काही अकारणच दुचाकीवर शहरात रपेट घालायचे. यामुळे जेव्हा पोलिसांनी सौम्य लाठीमाराचा प्रयोग सुरू केला तेव्हा हे सारे सक्तीने बंद झाले. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी सौम्य लाठीमार जवळपास बंद केलाय.

सोलापूर : एक वाईट सवय सोडण्यासाठी एक चांगली सवय जोपासण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या सवयी तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्ध करू शकतात. अशीच एक चांगली सवय सोलापूरकरांना गेल्या तीन - चार दिवसांच्या प्रयत्नानंतर लागली असल्याचे दिसून आले. ती सवय म्हणजे घरात बसण्याची, कर्फ्यूत बाहेर न पडण्याची...! 

कर्फ्यूतील भ्रमंती सुरू झाल्यापासून माझ्या दृष्टीस एक गोष्ट वारंवार दिसायची, ती म्हणजे काही नागरिक वारंवार कर्फ्यू तोडून रस्त्यावर येण्याच प्रयत्न करत होते, काही अकारणच दुचाकीवर शहरात रपेट घालायचे. यामुळे जेव्हा पोलिसांनी सौम्य लाठीमाराचा प्रयोग सुरू केला तेव्हा हे सारे सक्तीने बंद झाले. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी सौम्य लाठीमार जवळपास बंद केलाय. असे असूनही जे कोण पूर्वी रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करायचे ते अजिबात रस्त्यावर उतरलेल नाहीत. बाहेर पडण्याची वाईट सवय सोडून घरात बसण्याची चांगली सवय अंगिकारल्याने समस्त सूज्ञ सोलापूरकरांचे आभार, अभिनंदन...! 

दत्त चौकात मधोमध काही पोलिस खुर्च्या टाकून बंदोबस्तास बसल्याचे दिसले. माणिक चौकातही अशीच परिस्थिती. नाही म्हणायला वाटेत युनिक हॉस्पिटल परिसरात थोडीफार माणसांची वर्दळ दिसली. श्रीमंत आजोबा गणपती मंदिर परिसरही खूप शांत शांत दिसला. पुढे मधला मारुती चौकात किमान आठ ते 10 पोलिसांचा ताफा दिसला. येथे चारही रस्त्यावर अडथळे उभारण्यात आले आहेत. बंदोबस्तात असलेले वाहतूक शाखेच्या पोलिस के. के. पवार म्हणाले, हा माझ्या करिअरमधला जवळपास सातवा - आठवा कर्फ्यू आहे, पण हा जरा वेगळा कर्फ्यू आहे. हा आमच्या खात्याचा कर्फ्यू असला असता तर आम्ही नागरिकांना अजिबातच रस्त्यावर उतरू दिले नसते. खरं तर हा कर्फ्यू नागरिकांच्या हिताचा आहे, त्यांनी स्वतःहून काही बंधने पाळावीत. कोणाला तातडीची गरज असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही कर्फ्यूत फिरण्याची परवागनी असलेले रिक्षा किंवा वाहन त्यांना पाठवू. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे. 

पुढे मधला मारुती चौकातून कोंतम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठी मशिद आज शांत शांत दिसली. कुंभार वेस, जोडभावी पेठ, चाटला चौक मार्गे कन्ना चौकात मी दाखल झालो. पण या सर्व भागात कडकडीत बंद दिसला. पुढे राजेंद्र चौक मार्गे पुलगम, चाटला टेक्‍सटाईल या विख्यात शोरूमकडे गाडी दामटली. एरवी गर्दीने भरगच्च असणारे हे शोरूम्स पहिल्यांदाच बंद पाहिले. पूर्वभाग राम मंदिराचे सर्व दरवाजे कडेकोट बंद दिसले. तेथून हमरस्त्यावरून श्री बालाजी मंदिर गाठले. मंदिराच्या दारात पुरोहितांनी बैठक मारली होती, पण मंदिर बंद होते. 

उत्तर सदर बझार, दक्षिण सदर बझार, मौलाली चौक, बापूजी नगर या परिसरातील नागरिक मात्र थोड्याबहूत प्रमाणात रस्त्यावर दिसले. त्यामुळे इथल्या पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच काम लागल्याचे दिसून आले. तरीही नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसले. नागरिकांच्या हितासाठी पोलिस काम करत होते, पण हे नागरिकांना कळत कसे नाही, हा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. पुढे लष्करमार्गे सातरस्ता चौकात दाखल झालो. येथील सर्वच रस्त्यांवर बंदोबस्त तगडा होता. पुढे वाडिया, फॉरेस्टमार्गे रेल्वेस्टेशन परिसरात दाखल झालो. 

पोस्ट मुख्यालय बाजूला मारुती कार व तिथे 10-15 लोक उभारल्याचे दिसले. बहुधा प्रवासी, पोलिस असे कोणी असावेत म्हणून जवळ गेलो. तेव्हा दिसून आली ती रोटी बॅंक योजनची सेवा. मारुती कारमध्ये मसाला भात, रस्सा, मठ्ठा, पाण्याच्या बाटल्या याशिवाय दुसऱ्या एका गाडीत पाण्याचे कॅन दिसून आले. याठिकाणी सोमनाथ उपासे, विलास पटवेकर, जुबेर सय्यद, इलियास पटवेकर, गुलाब सोमदाल, शाहरूख खान पठाण गोरगरीब, भिकाऱ्यांना अन्नदान करत होते. रोटी बॅंकेचा हा अनुकरणनीय उपक्रम पाहून मला उबुंटू सिनेमातील गाणं आठवलं, हीच अमुची प्रार्थना अन्‌ हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे...! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur sancharbandi sanjay pathak article