सोलापूर टीमने केला भारतीय संस्कृती व किनारपट्टीवरील जैविक विविधतेचा अभ्यास दौरा ! 11 हजार 100 किलोमीटर प्रवास

प्रकाश सनपूरकर 
Tuesday, 19 January 2021

भारतीय संस्कृतीचा परिचय तसेच किनारपट्टीवरील जैविक विविधतेचा अभ्यास या चमूने केला. विशेष म्हणजे या मोहिमेत चांगले रस्ते व कोरोना विषयक काळजी या दोन्ही गोष्टींमुळे प्रवास सुखकर झाला. भारतीय समुद्र किनारपट्टीवरील श्रीमंत संस्कृती, विविधता आणि समृद्धीचा अनुभव मिळाला. 

सोलापूर : येथील डॉ. मेतन फाउंडेशन आयोजित संपूर्ण भारतीय किनारपट्टीवरील अनोखा प्रवास मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेतून किनारपट्टी पर्यटनाचा एक नवा मार्ग अधोरेखित करण्याचे काम यशस्वीपणे झाले. या मोहिमेत सोलापूरचे डॉ. व्यंकटेश मेतन, उपेंद्रकुमार महाराणा, डॉ. विजयकुमार गोदेपुरे आणि वैभव होमकर यांनी 21 दिवसांमध्ये 11 हजार 100 किलोमीटरचा प्रवास केला. या मोहिमे अंतर्गत "निसर्ग वाचवा' आणि भारतीय अविश्वसनीय संस्कृती आणि परंपरा अन्वेषित करण्याचे उद्दिष्ट साध्य केले. 

सुरवातीला सोलापूरहून गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) येथे जाऊन त्यांनी हा प्रवास सुरू केला. तेथून महाराष्ट्र, गुजरात या राज्याच्या समुद्र किनारपट्टीवरून भारत- पाकिस्तान सरहद्दीवरील लखपत बीचला भेट दिली. तेथून थेट मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड मार्गे पश्‍चिम बंगाल येथील भारत- बांगलादेश सरहद्दीवरील बखाली बीचला भेट दिली. तेथून भारतीय पूर्व किनारपट्टीवरून दक्षिणेकडे प्रवास करून कन्याकुमारी येथील बीचला भेट दिली. 

तेथून भारतीय पश्‍चिमेकडील किनारपट्टीवरून परत गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) येथे पोचले. भारतीय किनारपट्टीवर असलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, कच्छ येथील विजय विलास राजवाडा, लखपत किल्ला, गीर अभयारण्य, चीलिका पक्षी अभयारण्य ओडिसा, पुलिकॅट पक्षी अभयारण्य, प्रयागराज येथील त्रिवेणी संगम, वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर, द्वारका येथील द्वारकाधीशाचे मंदिर, मांडवी येथील किल्ला, गौतम बुद्धाच्या गुहा, जैन मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर, पश्‍चिम बंगालमधील गंगासागर, तंगी या गावातील जगन्नाथपुरी मंदिर, काकिनाडा पीठापुरम येथील दत्त मंदिर, श्रीहरी कोटा येथील श्री सतीश धवन स्पेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, पॉंडिचेरी येथील अरविंद आश्रम, रामेश्वर मंदिर, रामसेतू, कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक, मुर्डेश्वर येथील मंदिर, गोकर्ण महाबळेश्वर मंदिर, गणपतीपुळे, जयगड किल्ला आदींना भेट दिली. 

भारतीय संस्कृतीचा परिचय तसेच किनारपट्टीवरील जैविक विविधतेचा अभ्यास या चमूने केला. विशेष म्हणजे या मोहिमेत चांगले रस्ते व कोरोना विषयक काळजी या दोन्ही गोष्टींमुळे प्रवास सुखकर झाला. भारतीय समुद्र किनारपट्टीवरील श्रीमंत संस्कृती, विविधता आणि समृद्धीचा अनुभव मिळाला. 

आम्ही प्रवास केलेल्या मार्गांची व अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती याचा प्रचार करून हा मार्ग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात मोठे प्रवास करावेत, असे आवाहन करतो. 
- डॉ. व्यंकटेश मेतन, 
सहभागी सदस्य 

मोहिमेची वैशिष्ट्ये 

  • भारतीय संपूर्ण किनारपट्टीवरून प्रवास करताना देशातील राज्ये, दोन केंद्रशासित राज्ये यांना भेट 
  • 11 हजार 100 किलोमीटर प्रवास 
  • सलग 21 दिवस प्रवास 
  • प्रवासासाठी लागले 630 लिटर डिझेल 
  • एकूण 30 बीचला भेटी 
  • तीन धाम व चार ज्योतिर्लिंग मंदिरास भेट 
  • तीन पक्षी अभयारण्यांना भेट 
  • नऊ ऐतिहासिक स्थळांना भेट 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Solapur team studied Indian culture and coastal biodiversity