सोलापूर- विजयपूर रोड 20 ऑक्‍टोबरनंतरही राहणार बंदच ! ड्रेनेज जोडणीचे काम लांबणीवर 

तात्या लांडगे
Sunday, 18 October 2020

सोलापूर- विजयपूर मार्गावरील धर्मवीर श्री संभाजीराजे तलाव (कंबर तलाव) परिसरातील रेल्वे ब्रिजखालून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम 20 ऑक्‍टोबरपर्यंत संपणे अपेक्षित असतानाच शहरात परतीचा मोठा पाऊस झाला. त्यामुळे काम बंद ठेवावे लागल्याने साधारणपणे 24 ऑक्‍टोबरपर्यंत हा पूल बंदच राहील, अशी माहिती शहर वाहतूक पोलिसांनी दिली.

सोलापूर : सोलापूर- विजयपूर मार्गावरील धर्मवीर श्री संभाजीराजे तलाव (कंबर तलाव) परिसरातील रेल्वे ब्रिजखालून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरक्षितता म्हणून हा पूल 6 ऑक्‍टोबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम 20 ऑक्‍टोबरपर्यंत संपणे अपेक्षित असतानाच शहरात परतीचा मोठा पाऊस झाला. त्यामुळे काम बंद ठेवावे लागल्याने साधारणपणे 24 ऑक्‍टोबरपर्यंत हा पूल बंदच राहील, अशी माहिती शहर वाहतूक पोलिसांनी दिली.

शहर वाहतूक पोलिसांनी पत्रकार भवन ते झाशीची राणी पुतळा हा मार्ग बंद करून त्याठिकाणी बॅरिकेड लावले. त्यामुळे सोलापूर- विजयपूर मार्गावरील शहरातून जाणारी वाहतूक थांबली. या मार्गावरील वाहनांसाठी पर्याय मार्गाची उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार विजयपूरकडून सोलापुरात येणारी हलकी वाहने जुना विजयपूर नाका, मोदी हुडको कॉलनी, मोदी स्मशानभूमी, मोदी बोगदा, मोदी पोलिस चौकीमार्गे पुढे सातर स्ता अशी वळविण्यात आली. सोलापूरकडून विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हाच मार्ग असल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. तर जड वाहने सैफूल, आत्तार नगर प्राधिकरण रोड, डी- मार्ट, आसरा चौक, महावीर चौकमार्गे पुढे वळविण्यात आली. मात्र, रस्त्यांवरील दुभाजकांमुळे जड वाहनांना अडचण निर्माण झाली आणि वाहतूक कोंडी वाढली. त्यामुळे ही वाहने संत रोहिदास चौक, भारती विद्यापीठ, दावत चौक, गोंविदश्री मंगल कार्यालय, डी- मार्ट, आसरा चौक, महावीर चौक असा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ड्रेनेज जोडणीचे काम 10 मीटरपर्यंत झाले
सोलापूर- विजयपूर रोडवरील कंबर तलाव परिसरातील रेल्वे ब्रिजखाली ड्रेनेज टाकण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 10 मीटर काम पूर्ण झाले असून 20 ऑक्‍टोबरपर्यंत काम संपविण्याचे नियोजन आहे. मात्र, पावसामुळे थोडासा विलंब लागण्याची शक्‍यता असल्याने त्यासंदर्भात पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

आसरा पुलाचे स्टक्‍चरल ऑडीटच नाही
रेल्वे ब्रिजखाली काम सुरू असल्याने ब्रिजवरून जाणाऱ्या वाहनांमुळे रस्ता खचण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली. तसेच कामामुळे रहदारीस अडथळा होऊन अपघात होण्याचीही शक्‍यता व्यक्‍त झाली. ड्रेनेज जोडणीचे काम पूर्ण होईपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानंतर अरुंद आणि सुमारे 20 वर्षांपासून स्टक्‍चरल ऑडिटच्या प्रतीक्षेतील आसरा पुलावरुन जड वाहतूक सुरु केल्याची चर्चा आहे. आसरा पुलाचे स्टक्‍चरल ऑडीट करुन पुलाचे रूंदीकरण करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्‍तांना निवेदनही देण्यात आले आहे. तर यासंदर्भात उद्या (रविवारी) खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्याशी बैठक होणार असून खासदार निधीतून हे काम व्हावे, अशी मागणी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur-Vijaypur road will remain closed even after October 20! Drainage connection work delayed