सोलापूर "झेडपी'च्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळच 

संतोष सिरसट 
Monday, 7 September 2020

ऑनलाइन-ऑफलाइनचा गोंधळ बरा नव्हे 
सभा कोणत्या प्रकारे घ्यायची यावरुन बराच गोंधळ सुरु आहे. जिल्हा परिषदेचे 67 सदस्य व पंचायत समितीचे 11 सभापती सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असतात. त्या सगळ्यांनी एकाच वेळी ऑनलाइन सभेत बोलल्याने गोंधळ उडणार हे नक्की आहे. एखाद्या विषय समितीची सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली तर त्यामध्ये फारशा अडचणी येणार नाहीत. मात्र, 78 सदस्यांसाठी ऑनलाइन सभा घेणे योग्य नसल्याचे श्री. नकाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. ऑनलाइन सभा घेण्यास काही सदस्यांनी सुरवातीलाच विरोध केला होता. पण, अधिकाऱ्यांच्या हट्टापायी गोंधळात झालेली सभा रद्द करावी लागली. 

सोलापूर ः जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज आयोजित केली होती. दुपारी दोन वाजता ही सभा सुरु झाली. मात्र, त्यामध्ये कोण काय बोलतय काहीच कळत नव्हती. जवळपास 45 मिनिटे हा गोंधळ सुरु होता. त्या गोंधळानंतर ही सभाच रद्द करण्याचा निर्णय अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी घेतला. सभा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन याचा गोंधळ मात्र जिल्हा परिषदेत दिवसभर सुरु होता. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सभा ऑनलाइन घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ऑनलाइन सभा घेण्याची सगळी व्यवस्था केली होती. जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना व पंचायत समितीच्या सभापतींना ऑनलाइन सभेसाठीची लिंक पाठविली होती. त्यानुसार दुपारी दोन वाजता सभा सुरु झाली. एका वेळी चार-पाच सदस्य बोलत असल्याने काहीच कळत नव्हते. सगळा गोंधळच सुरु होता. नेमके कोण कोणाला काय बोलतेय याचा काहीच संदर्भ लागत नव्हता. सभेसाठी 45 मिनिटांची कालावधी ठरवून दिला होता. सदस्यांच्या गोंधळामध्ये हा वेळ कधी निघून गेला कळालेच नाही. त्यामुळे नाविलाजाने ही सभा रद्द करावी लागली असल्याचे अध्यक्ष कांबळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

जिल्हा परिषदेची यापूर्वीही ऑनलाइन सभा झाली होती. त्या सभेमध्येही गोंधळच झाला होता. कुणाचा कुणाला ताळमेळ नव्हता. त्यामुळे ती सभा रद्द करुन नव्याने जिल्हा नियोजन भवनमध्ये मागील महिन्यात सभा घेण्यात आली. त्यानंतर ग्रामविकास विभागाने ऑफलाइन सभा घेण्यास बंदी घातल्यामुळे आज ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, आज पुन्हा त्या सभेमध्ये गोंधळ झाल्याने ती सभा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर आली. 

आजची सर्वसाधारण सभा रद्द झाल्यानंतर सोलापूर व परिसरात राहणारे काही सदस्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आले. ऑनलाइन सभा घेणे योग्य नाही. काहीही झाले तरी सभा ऑफलाइनच व्हायला पाहिजे असे मत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडले. त्यावेळी अध्यक्ष कांबळे, पक्षनेते अण्णाराव बाराचारे, माजी पक्षनेते आनंद तानवडे, नितीन नकाते, रेखा राऊत या सदस्यांनी सभा ऑफलाइन घेण्याची मागणी केली. त्यानंतर येत्या 10 सप्टेंबरला ऑफलाइन सभा घेण्याचा निर्णय झाल्याचे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले. ऑफलाइन सभा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यासाठी त्यांची परवानगी मागितली असल्याचेही श्री. कांबळे यांनी सांगितले. मागील महिन्यात ज्याप्रमाणे नियोजन भवन येथे सभा झाली होती, त्याचप्रमाणे येत्या 10 सप्टेंबरला त्याठिकाणीच सभा घेतली जाणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur "ZP's online general meeting again confused