बस चालक-वाहकाची मनमानी ! करकंब बसस्थानकावर गाडी नेण्यास नियमबाह्य नकार

Bus
Bus

करकंब (सोलापूर) : काही लांब पल्ल्याच्या बसचे चालक-वाहक पंढरपूर तालुक्‍यातील सर्वात मोठ्या करकंब बसस्थानकावर बस न नेता बाहेरूनच बस नेत असल्याने प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत. वास्तविक पाहता, सर्व गाड्यांना करकंब बसस्थानकात बस आणणे अनिवार्य असताना काही चालक-वाहकांच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

पंढरपूरहून टेंभुर्णी, करमाळा, नगर, शिर्डी, पाथर्डी, धुळे, नंदुरबार, पुणे आदी ठिकाणची बससेवा करकंब मार्गे आहे. या सर्व बसना एसटी महामंडळाने करकंबचा थांबा अनिवार्य केला आहे. चालकांच्या माहितीसाठी याबाबतचे सूचना फलकही उजनी वसाहत व जळोली चौकात लावले आहेत. पण काही चालक आणि वाहकांकडून अजूनही प्रवाशांशी हुज्जत घालून त्यांना बाहेरील हायवेवरच सोडले जात आहे. 

वास्तविक पाहता कोरानाच्या काळात बससेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक महिने कामगारांचे वेतन करणेही शक्‍य झाले नव्हते. त्यानंतर ही घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक असताना उपरोक्त मार्गावरील बसमध्ये बसलेल्या करकंबच्या प्रवाशांना बस करकंब गावात जाणार नसल्याचे कारण सांगून खाली उतरविण्याचे प्रकार घडत आहेत. 

असाच प्रकार मंगळवारी (ता. 2) रोजी घडला. सकाळी नऊ वाजता धुळे बसमध्ये बसलेल्या करकंबच्या चार प्रवाशांना चालक आणि वाहकाने बस करकंब गावात जाणार नसल्याचे कारण सांगत खाली उतरविले. विशेष म्हणजे या गाडीत अवघे दहा ते बाराच प्रवासी होते. तेवढ्याच प्रवाशांना घेऊन ही बस मार्गस्थ झाली. त्यानंतर करकंबच्या प्रवाशांनी चौकशी कक्षातील वाहतूक नियंत्रकांची भेट घेऊन घडला प्रकार सांगून रीतसर तक्रार नोंदविली. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना करकंबचा थांबा अनिवार्य असल्याने या चालक-वाहकांचे वर्तन प्रवाशांशी आणि महामंडळाच्या नियमांशी प्रतारणा करणारे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

करकंब बसस्थानकावरून परिसरातील पंधरा ते सोळा गावांतील नागरिक प्रवास करत असतात. यापूर्वी सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसस्थानकात येणे अनिवार्य करावे यासाठी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर महामंडळाने आवश्‍यक ठिकाणी सूचनाफलक लावून सर्व बस बस्थानकातूनच जातील याची काळजी घेतली आहे. मात्र अजूनही काही वाहक आणि चालक प्रवाशांना नाहक त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 
- सचिन शिंदे, 
करकंब ग्रामस्थ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com