"ती' त्याला सोडून तशीच पळाली...

अशोक मुरुमकर
Saturday, 7 March 2020

टेंभुर्णी-नगर महामार्गावर पंढरपूर, सोलापूर, सातारा, कवठेमहांकाळ, मंगळवेढा या भागातील गाड्या औरंगाबाद, धुळे, नाशिक, मालेगाव, बीड, पाथर्डी, करमाळा या गावांना जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बस मोठ्याप्रमाणात असतात. या महामार्गावर गुरुवारी एक बस वाहकाला सोडून पुढे गेली.

सोलापूर : "हात दाखवा आणि बस थांबवा' असं म्हणत एसटी बस महाराष्ट्रात गावागावांत नागरिकांना सेवा देते. अपवाद वगळता सर्व गावांत पोचलेल्या या एसटीवर प्रवाशांचा विश्‍वास कायम आहे. मात्र, गावाकडे आठवडा बाजार असेल किंवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत गर्दी असेल तर हात दाखवून ही एसटी बस न थांबवता प्रवाशांना सोडून पुढे जाते. परंतु हीच बस वाहकाला सोडून जाते, तेव्हा आश्‍चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. टेंभुर्णी-नगर महामार्गावर हा हास्यास्पद प्रकार घडला आहे. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चालकाने गाडी थांबवली आणि वाहकाला गाडीत घेतले. 
टेंभुर्णी-नगर महामार्गावर पंढरपूर, सोलापूर, सातारा, कवठेमहांकाळ, मंगळवेढा या भागातील गाड्या औरंगाबाद, धुळे, नाशिक, मालेगाव, बीड, पाथर्डी, करमाळा या गावांना जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बस मोठ्याप्रमाणात असतात. या महामार्गावर गुरुवारी एक बस वाहकाला सोडून पुढे गेली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस कवठेमहांकाळ येथून नाशिकला प्रवासी घेऊन जात होती. जेऊरपासून पुढे गेल्यानंतर झरे फाटा येथे ही दुपारी 1.6 वाजता ही गाडी आली. तेव्हा परिवहन महामंडळाचे प्रशिक्षण वाहन (बस) करमाळ्याकडून जेऊरकडे येत होते. त्यांनी नाशिकला जाणाऱ्या बसला हात केला. त्यावर चालकाने बस थांबवली. गाडी थांबताच प्रशिक्षण वाहनमधून एकजण थांबलेल्या बसकडे आले. तेव्हा गाडीतील प्रवाशांना वाटले, गाडीत तिकिटांची तपासणी करायची असेल. त्यामुळे अनेकांनी तिकिटे काढून ठेवली. मात्र, प्रशिक्षण वाहनातून आलेल्या अधिकाऱ्याने गाडीची तपासणी न करता वाहकालाच खाली बोलावले आणि काही क्षणातच चालकाला जाण्याचा इशारा केला. त्यानंतर चालकाने गाडीत वाहक आहे की नाही हे पाहिलेच नाही. त्याने गाडी पुढे नेली. गाडी पुढे गेल्यानंतर गाडीत वाहक नसल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गाडीत कालवा केला. मात्र, तरीही प्रवासी का कालवा करत आहेत हे चालकाच्या लक्षात आले नाही. त्यानंतर एका प्रवाशाने गाडीतली बेल वाजवली तेव्हा चालकाने गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर काहीवेळात पाठीमागून चालक गाडीत आले. तेव्हा प्रवासी त्यांना म्हणाले, नेहमी आमच्यासाठी तुम्ही बेल देता आज तुमच्यासाठी आम्ही गाडीची बेल वाजवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ST bus ran without the conductor