लॉकडाउन : सोलापूर जिल्ह्यात पोलिसांवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पंढरपूर शहर व तालुक्‍यातील अन्य तीन पोलिस ठाण्यांतर्गत आज सुमारे 300 दुचाकी जप्त करून संबंधितांवर कारवाई केली. दरम्यान, भाळवणी (ता. पंढरपूर) येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनेक लोक संचारबंदीचे उल्लंघन करत दुचाकीवरून फिरत आहेत. अशा मोकाट फिरणाऱ्या लोकांवर आज पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर व तालुक्‍यातील अन्य तीन पोलिस ठाण्यांतर्गत आज सुमारे 300 दुचाकी जप्त करून संबंधितांवर कारवाई केली. दरम्यान, भाळवणी (ता. पंढरपूर) येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - आम्ही सुखी आहोत, स्वत:ची काळजी घ्या

विनाकारण फिरणाऱ्या 300 लोकांच्या दुचाकी जप्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून लोकांचे समुपदेशन सुरू आहे. लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही अनेक लोक विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शहर व तालुक्‍यात अनेक लोक दुचाकीवरून मोकाटपणे फिरत असल्याचे चित्र आज दिसून आले. अशा मोकाट फिरणाऱ्या लोकांवर पंढरपूर शहर, तालुका ठाणे, ग्रामीण ठाणे आणि करकंब ठाणे अशा चारही पोलिस ठाण्यांतर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्वत्र नाकाबंदी कऱण्यात आली होती. यात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या सुमारे 300 लोकांच्या दुचाकी जप्त करून त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरात सर्वाधिक सुमारे 150 दुचाकी जप्त केल्या आहेत. तालुका पोलिस ठाण्यांतर्गत 50 दुचाकी जप्त केल्या आहेत. ग्रामीण पोलिसांनी 40 तर करकंब पोलिसांनी 40 दुचाकी जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

दगडफेकप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, भाळवणी (ता. पंढरपूर) येथे संचारबंदी काळात दुचाकीवरून मोकाटपणे फिरणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने कारवाई का करता म्हणून दगडफेक केली. याप्रकरणी पोलिस हवालदार स्वप्नील बापू वाडदेकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुखदेव अनंता गायकवाड, संध्या सुखदेव गायकवाड, संजय अनंता गायकवाड, लक्ष्मी संजय गायकवाड, अमोल खरात (रा. भाळवणी) यांच्यासह एकूण सात जणांविरोधात दगडफेक आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय गायकवाड व लक्ष्मी संजय गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stoneware on police in Solapur district