मुलांच्या शिक्षणासाठी अंधारातही तिची होडी पाण्यात

गजेंद्र पोळ 
Sunday, 8 March 2020

चिखलठाण लांडाहिरा परिसरात उजनी धरण काठावर अश्‍विनी अण्णा सल्ले छोट्या झोपडीत राहून पतीसोबत परंपरागत मासेमारी व्यवसाय करतात. सुरवातीला अण्णा व गोकूळ दोघे भाऊ एका होडीच्या मदतीने मासेमारी करत होते. त्यांना कधी हजार तर कधी 100 रुपयांतच समाधान मानावे लागत.

चिखलठाण (सोलापूर) : दररोज पहाटे तीन वाजता "ती' उजनी धरणात पतीसोबत मासे धरण्यास जाते. पतीसोबत मासे पकडणे, जाळे टाकणे, होडी वल्हवणे आदी कामे ती दररोज 10 तास करते. कारण, तिला मुलांना शिकवून मोठे करायचे आहे. शिक्षणाअभावी आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत याकरिता अश्‍विनी सल्लेंची होत धडपड आगळे उदाहरण बनले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने घेतलेला त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा.
चिखलठाण लांडाहिरा परिसरात उजनी धरण काठावर अश्‍विनी अण्णा सल्ले छोट्या झोपडीत राहून पतीसोबत परंपरागत मासेमारी व्यवसाय करतात. सुरवातीला अण्णा व गोकूळ दोघे भाऊ एका होडीच्या मदतीने मासेमारी करत होते. त्यांना कधी हजार तर कधी 100 रुपयांतच समाधान मानावे लागत. जेमतेम जगण्यापुरतीच रक्कम हातात मिळत. मुलांना शिकवायचे असल्यास दोन होड्या घेतल्यास चांगली कमाई होईल असे अश्‍विनी सल्ले यांनी दोन्ही कुटुंबांना सुचविले. 
परंतु, मासेमारीकरिता होडी चालवण्यास दोन व्यक्तींची गरज असते. उजनी धरणात मगरीसारख्या जलचर प्राण्यांची भीती कायम असते. पण, अश्‍विनी सल्ले स्वतः कसलाही विचार न करता पतीसोबत धरणात होडी चालवण्यास तयार झाल्या. उजनी धरणाच्या पाण्यात मासे धरण्यास पहाटे तीन वाजता पतीसोबत अश्‍विनी सल्ले पाच तास होडी चालवतात. घरी येऊन स्वयंपाक व अन्य कामे करून पुन्हा दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत जाळे टाकण्याकरिता होडी चालवतात. हे पाहून गोकूळची पत्नी रेखा सुद्धा मासेमारीस जाऊ लागली. पतीच्या खांद्याला खांदा लावून एवढे कष्ट कशासाठी करतात असे अश्‍विनी यांना विचारले असता, आपण शिक्षण घेतले नसल्याने गुरासारखे कष्ट करावे लागत आहेत. निदान मुलांवर ही वेळ येऊ नये, त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आनंदाने कष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of a Fishermans Woman in Karmala taluka