विद्यार्थी गटांच्या माध्यमातून सोडवली अध्ययनाची समस्या 

संतोष सिरसट
Sunday, 27 September 2020

ऑनलाइन शिक्षण शाळेला पर्याय नाही 
याठिकाणी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. सध्या नाविलाज म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा वापर केला जात आहे. मात्र, "ऑनलाइन शिक्षण हे शाळेला कधीच पर्याय ठरू शकत नाही.' आता शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील शाळा कधी सुरू होईल याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. 
सोमनाथ मिसाळ, तंत्रस्नेही शिक्षक. 

सोलापूर ः ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनच नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहतात की काय याची भीती वाटत होती. पण, त्यावर गट तयार करणे हा उपाय शोधला व विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचण दूर केली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील सोमनाथ मिसाळ या गुरुजींनी. त्यांनी गटकार्याच्या माध्यमातून दिलेला अभ्यास मुले व्हॉटसऍपच्या माध्यमातून सोडवू लागल्याने त्याचा मनस्वी आनंद मिसाळ गुरुजींना होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीत पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील पालक दिवसभर काबाडकष्ट करून संध्याकाळी मुलांच्या अभ्यासात मनापासून रस घेऊ लागले आहेत. कधी नव्हे तो मुलांबरोबर अशा स्थितीत पालकांचाही अभ्यास होऊ लागला. आपला मुलगा काहीतरी शिक्षण घेत असल्याचा मनस्वी आनंद पालकांनाही होऊ लागला आहे. 
लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण ही संकल्पना पुढे आली. ही संकल्पना त्यावेळी केवळ पुढे आली होती. पण आता हळूहळू विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडू लागली आहे. या ऑनलाइन शिक्षणाचा आनंद विद्यार्थ्यांना वाटू लागला असल्याचे श्री. मिसाळ यांनी सांगितले. 
"शाळा बंद, शिक्षण चालू' हा उपक्रम सोलापूर जिल्हा परिषदेने सुरू केला. या उपक्रमाला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्याचा फायदा असा झाला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. ऑनलाइन अध्यापनासाठी सर्व शिक्षक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये ऑनलाइन अध्यापनासाठी खास कक्षाची स्थापना केली आहे. तिथे प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विषयाचे अध्यापन करण्यासाठी दर्जेदार असे शैक्षणिक व्हिडीओ तयार केले जात आहेत. तसेच व्हॉटस्‌ऍपवर विविध ग्रुप तयार करण्यात आलेले असून त्यावर अभ्यास देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. त्याच माध्यमातून पालकांशी हितगुज साधणे अशा गोष्टीही होऊ लागल्या. त्याचप्रमाणे गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स अशा ऍपच्या माध्यमातून प्रत्यक्ष मुलांना अध्यापन करणे सुरू झाले. ऑनलाइन शिक्षणाच्या काळात शासनाने तयार केलेल्या दीक्षा ऍपचाही खूप उपयोग झाला. यूट्युब वरील व्हीडीओ फायदेशीर ठरत आहेत. आता सगळीकडे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असून सुरवातीला ऑनलाइन शिक्षण देताना काही अडचणीदेखील आल्या. त्यावर मात करत अध्ययन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी देखील आता या ऑनलाइन शिक्षणाची गोडी वाटू लागली असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Study problems solved through student groups