वडील वीटभट्टीवर काम केले तरच मिळायचं एकवेळचं जेवण, अशा परिस्थितीत मुलाने मंत्रालय सहायकापासून मिळवली चार पदे; आता आहे... 

अक्षय गुंड 
Friday, 18 September 2020

पोटाची खळगी भरण्यासाठी वडील दररोज दुसऱ्याच्या शेतात मजुरीबरोबर रात्रंदिवस वीटभट्टीवर काम करायचे. या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मुलांनी शिकून मोठं सायब.. डॉक्‍टर... व्हावं अशी आई-वडिलांची प्रबळ इच्छा होती. आज आई-वडिलाचे स्वप्न सत्यात उतरले असून, वीटभट्टी कामगाराचा मुलगा आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाला आहे. संतोष रघुनाथ नागटिळक असे त्या युवकाचे नाव. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : घरात अठराविश्वे दारिद्य्र, गरिबी पाचवीला पूजलेली. भूमिहीन कुटुंब असल्याने काम करेल तेव्हाच घरात चूल पेटायची. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी वडील दररोज दुसऱ्याच्या शेतात मजुरीबरोबर रात्रंदिवस वीटभट्टीवर काम करायचे. या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मुलांनी शिकून मोठं सायब.. डॉक्‍टर... व्हावं अशी आई-वडिलांची प्रबळ इच्छा होती. आज आई-वडिलाचे स्वप्न सत्यात उतरले असून, वीटभट्टी कामगाराचा मुलगा आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाला आहे. संतोष रघुनाथ नागटिळक असे त्या युवकाचे नाव. 

शिक्षकाने दिला वडिलांना मोलाचा सल्ला 
माढा तालुक्‍यातील विठ्ठलवाडी हे जवळपास दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावात नागटिळक हे कुटुंब वर्षानुवर्षे शेतमजुरी व वीटभट्टीवर काम करून उपजीविका करत असे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. काम करेल तेव्हाच घरात खायला मिळत असे. संतोष यांच्याबरोबर मोठा भाऊ व दोन बहिणी व आई-वडील असे सहा जणांचे कुटुंब होते. आपल्या मुलांनी शिकून मोठं सायब व्हावं अशी आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे ते रात्रंदिवस काबाडकष्ट करत. गावात शेतमजुरी बरोबरच ते सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी वीटभट्टीच्या कामासाठी संसाराचे गाठोडे पाठीवर बांधून सतत हे कुटुंब फिरत असायचे. संतोष हे लहानपणापासूनच शिक्षणात हुशार होते. परंतु वीटभट्टीच्या कामाच्या निमित्ताने सतत या ना त्या गावात जात असल्याने त्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत असायचा. संतोष यांचे वडील एकदा गावी आले असता, गावातील बाळू गुंड या शिक्षकांनी त्यांना "तुझी मुले हुशार आहेत. असे गावोगावी करून मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नको. तुझ्या परिस्थितीत बदल झालाच तर तो फक्त मुलांच्या शिक्षणानेच होईल. त्यामुळे इथेच गावात राहा, चटणीभाकर खा परंतु मुलांना शिकव', असा मौलिक सल्ला दिला. 

एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी तीन मार्क पडले कमी 
संतोष यांच्या वडिलांनी देखील तो मान्य करत गावातच राहून मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावात संतोष व त्यांच्या भावाचे चांगल्या प्रकारे शिक्षण मिळाले. परंतु त्यावेळी देखील भाकरीचा प्रश्न तसाच होता. पुढे संतोष हे माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी आले. इथे त्यांना समाजकल्याणच्या वसतिगृहात राहण्यासाठी प्रवेश मिळाला. इथे त्यांना मोफत जेवण, शाळेचा गणवेश व इतर खर्चासाठी पंचवीस रुपये मिळायचे. घरची परिस्थिती लक्षात घेत त्यांनी येथे चांगल्या प्रकारे अभ्यास करून दहावीत 75 टक्के गुण मिळवले. त्यावेळी एवढे मार्क मिळाल्याने संतोष यांच्या आईची आपल्या मुलाने गावातील डॉक्‍टर मोहन शेगर यांचा आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणेच डॉक्‍टर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. त्या दृष्टीने सोलापुराच्या भारती विद्यापीठमध्ये कनिष्ठ विद्यालयात प्रवेश घेतला. नशिबाने इथेही समाजकल्याणच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला. डॉक्‍टर व्हायचे आहे, त्यामुळे त्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास सुरू केला. बारावीत 72 टक्के गुण मिळाले. तसेच वैद्यकीय सामाईक परीक्षेत 152 गुण मिळाले. परंतु अनुदानित एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी तीन मार्क कमी पडत असल्याने नाइलाजाने दंतवैद्यकीय या शिक्षणासाठी पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील या महाविद्यालयात प्रवेश घेतला. 

मित्रांनी दिला मानसिक आधार 
नशिबाने आतापर्यंतच्या त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्रत्येक ठिकाणी त्यांना समाजकल्याणच्या वसतिगृहात राहण्याची व जेवणाची सोय होत असल्याने इतर गोष्टींची चिंता नव्हती. येथे शिक्षण घेत असताना ते मनातून नाखूष होते. कॉलेजने शिक्षणासाठी आवश्‍यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली होती; मात्र इतर आवश्‍यक बाबींसाठी देखील इतरांची मदत घ्यावी लागत असल्याने आत्मसन्मान दुखावला जातोय, असे वाटून शिक्षण सोडून द्यावे अशा मन:स्थितीत होते. वेळप्रसंगी त्यांनी पुस्तके व सायकल देखील विकली. हे शिक्षण घेत असताना आपले आयुष्य अंध:कारमय झाले आहे व आपला निर्णय चुकल्याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे घरी न सांगताच त्यांनी दंतवैद्यकीयचे शिक्षण सोडून मुक्त विद्यापीठात बीएला प्रवेश घेतला. आपण आयुष्यात आता काहीच होऊ शकत नाही, भविष्य अंध:कारमय झाले आहे असे त्यांना सतत वाटू लागले. डोळ्यासमोर आई-वडिलांचे कष्ट व घरची परिस्थिती दिसायची. मनाने पूर्णपणे ते खचले होते. काय करावे या मानसिकतेत असताना वसतिगृहातील मित्र मुकेश कसबे, मयूर खटावकर, विष्णू साळुंके यांनी संतोष यांना "केले तर काहीच अवघड नाही. तू हे करू शकतोस' असा मानसिक आधार दिला. 

चळवळीतून बाहेर पडून स्पर्धा परीक्षेचा घेतला निर्णय 
या काळातच संतोष हे सामाजिक चळवळीत सक्रिय झाले. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पूर्वीपासूनच गारूड होते. त्यामुळे सत्यशोधक शेतकरी संघटना, युवक क्रांती दल अशा शोषित आदिवासींच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागले. या सर्वातून एक वैचारिक बैठक आणि पुढील कामाची दिशा पक्की होत गेली. परंतु नंतर त्यांना जाणवायला लागले, की चळवळीत राहून विचारात एकारलेपणा येतोय. अशाने आपला कुठेही निभाव लागणार नाही. मग या सगळ्यांतून बाहेर पडत त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 

राज्यसेवेच्या परीक्षेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाला गवसणी 
संतोष यांनी अभ्यासाला सुरवात केली. परंतु कोचिंग क्‍लास लावणे वगैरेचा विचारसुद्धा ते करू शकत नव्हते, एवढे पराकोटीचे दारिद्य्र त्यांच्या घरी होते. शिक्षण घेत असताना मध्यंतरीचा गेलेला काळ व घरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चिकाटीने त्यांनी अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात व मुक्त विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांना स्टेट बॅंक ऑफ हैदराबादमध्ये क्‍लार्क म्हणून नोकरी लागली. पुढे एलआयसी विकास अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' या म्हणीप्रमाणे त्यांनी पुन्हा चिकाटीने आणखी अभ्यास केला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय सहाय्यक तसेच आयकर निरीक्षक, नायब तहसीलदार असे करत त्यांनी 2017 मध्ये झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदाला गवसणी घातली. सध्या ते जळगाव जिल्ह्यात परिविक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

चूक लक्षात आली तर हवे ते साध्य करू शकतो 
वीटभट्टी कामगाराचा मुलगा ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी असा प्रवास करत असताना संतोष नागटिळक यांच्या जीवनात आलेले चढ-उतार व त्यांच्याशी त्यांनी केलेला सामना हा इतर युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आपल्या हातून झालेली चूक वेळीच लक्षात आली तर आपणास हवे ते आपण साध्य करू शकतो, असे संतोष नागटिळक यांचे मत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful journey of Santosh Nagtilak the son of a brick kiln worker to the post of Deputy Chief Executive Officer