
अपवाद वगळता जवळ जवळ सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने करमाळा तालुक्यातही ऊसतोडणी मजुरांची लगबग सुरू झाली आहे. गावागावांत शेतात उसाच्या बांधावर ऊस तोडणी मजूर दाखल झाले आहेत तर अजूनही काही मजूर दाखल होत आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याने किती दर देणार, हे जाहीर केलेले नाही. अशा परिस्थितीत गाळप हंगाम मात्र संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
करमाळ्यात गाळप हंगाम संथ गतीने ! पाहुण्या ऊसतोड कामगारांमुळे मात्र बाजारपेठांमध्ये उत्साह
केत्तूर (सोलापूर) : अपवाद वगळता जवळ जवळ सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने करमाळा तालुक्यातही ऊसतोडणी मजुरांची लगबग सुरू झाली आहे. गावागावांत शेतात उसाच्या बांधावर ऊस तोडणी मजूर दाखल झाले आहेत तर अजूनही काही मजूर दाखल होत आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याने किती दर देणार, हे जाहीर केलेले नाही. अशा परिस्थितीत गाळप हंगाम मात्र संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
यंदा कोरोना महामारीच्या संकटानंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टी झाल्याने उसाच्या पिकांत पाणी साचले तसेच रस्त्यांची वाट लागली. त्यामुळे शेतातून ऊस भरलेले वाहन बाहेर काढणे अवघड होत आहे. सर्व काही सुरळीत होण्यासाठी अजून दोन - एक आठवड्यांचा काळ जावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी रस्त्याच्या कडेचा फड यालाच कारखाने पसंती देत आहेत.
करमाळा तालुक्यातील ऊस बारामती ऍग्रो, अंबालिका शुगर, भैरवनाथ शुगर, कमलाई शुगर या कारखान्यांकडे जात असला तरी, गेलेले वाहन सुरू असलेले कारखाने जॅमिंग होत असल्याने परत फडात येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत असल्याने उशीर होत आहे. त्यामुळे ऊस तोडणीस व गाळपाच्या सुरवातीलाच म्हणावी तशी गतीच आलेली नाही. ही गती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येण्याची शक्यता आहे
दरम्यान, हळूहळू हंगाम सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठा मात्र गजबजू लागल्या आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून लॉकडाउनमुळे छोटे व्यापारी खचून गेले होते. व्यापारात मरगळ आली होती; मात्र परिसरात दाखल झालेल्या व दाखल होत असलेल्या ऊसतोड पाहुण्यांमुळे उत्साह निर्माण झाला आहे.
कोरोनानंतर पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पार कोलमडून गेले आहे. आता साखर कारखान्यांनी तरी दिलासा म्हणून उसाचे बिल एकरकमी द्यावे.
- शहाजी पाटील,
ऊस उत्पादक शेतकरी, केत्तूर
कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच एफआरपीप्रमाणे एकरकमी उसाचे बिल जाहीर करून ते शेतकऱ्यांना त्वरित द्यावे.
- आबासाहेब ठोंबरे,
शेतकरी
संपादन : श्रीनिवास दुध्याल