esakal | कौतुकास्पद ! बार्शीच्या युवकाचा 30 तासांत 360 किलोमीटर सायकलवर प्रवास

बोलून बातमी शोधा

Sumanyu More from Barshi has cycled 360 kilometers in 30 hours.jpg}

एक वर्षभर तयारी करीत होतो. दररोज सकाळी, सायंकाळी 40 किमी सायकल चालवून प्रॅक्‍टीस केली.

कौतुकास्पद ! बार्शीच्या युवकाचा 30 तासांत 360 किलोमीटर सायकलवर प्रवास
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी युद्ध करुन किल्ला जिंकला होता .शिवरायांचा आदर्श मनात ठेवून रायगडावर जाऊन पायथ्यावर डोके टेकवून दर्शन घ्यायचे ही मनाशी केलेला संकल्प शिवजयंतीदिनी 30 तास सायकलवर 360 किमी प्रवास करुन पूर्ण केला असून यापुढेही 600 किमीचा टप्पा पूर्ण करायचा आहे. असे बार्शीत दहावीमध्ये शिक्षण घेत असलेला 15 वर्षाचा युवक सुमान्यू विशाल मोरे याने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

लहानपणापासूनच मैदानी खेळ खेळत होतो. रोज दोन ते तीन तास व्यायाम करायची सवय. तसेच मोबाईलपासून खूपच दूर राहिलो. अभ्यासासाठी ऑनलाइन मोबाईल वापरतो. सायकलवर रायगडला जायचे, असा मनाशी बांधलेला चंग होता. गेल्यावर्षी जाण्याचे नियोजन केले होते. पण आई श्वेता व वडिल विशाल यांनी वय कमी असल्याने जाण्यास नकार दिला. एक वर्षभर तयारी करीत होतो. दररोज सकाळी, सायंकाळी 40 किमी सायकल चालवून प्रॅक्‍टीस केली. बार्शी सायकलिंग क्‍लबचे निलेश देशमुख यांच्या संपर्कामध्ये येताच त्यांनी प्रवासाचे नियोजन, आहार कसा व किती घ्यायचा एक तासानंतर ब्रेक, पाच मिनिटं थांबणे, जेवणानंतर दहा मिनिटे अन्‌ सायकल कशी चालवायची अशा टिप्स दिल्या, असे सुमान्यू सांगत होता.

साताऱ्याच्या मुलासोबत विवाह करणाऱ्या "त्या' तरुणीने यापूर्वीही केला होता विवाह ! 
 
बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून 18 फेब्रुवारीला पहाटे पाचला निघालो. सायकलिंग क्‍लबने म्हैसगावपर्यंत सोबत येऊन प्रोत्साहन दिले अन्‌ माझा प्रवास सुरु झाला. सायकलवरुन जात असताना रस्त्यातील इंदापूर, सणसर, बारामती, फलटण, पोलादपूर येथे विविध संघटनांनी सत्कार केले. सन्मानचिन्ह दिले तर अनेक युवकांनी सोबत येऊन सेल्फी घेतली. त्यामुळे माझा उत्साह वाढत होता. महाबळेश्वर येथील घाट पार करण्यासाठी तब्बल सात तास लागले, तर रायगडजवळील घाटात पाच तास प्रवास करताना पाऊस अन्‌ वारे जोरात असल्याने सामोरे जावे लागले. पूर्ण रात्रभर प्रवास करीत होतो. आयुष्यातील हा अविस्मरणीय अनुभव असल्याचे सुमान्यूने सांगितले. 

असा होता आहार 

बार्शी ते रायगड प्रवासामध्ये काजू, बदाम,अंजीर, अक्रोड, नारळ पाणी असे एक तासानंतर घेत होतो तर जेवणामध्ये चपाती, भाकरीसह बटाट्याची भाजी व पुलाव घेतला. नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. आत्ताच्या तरुणांनी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. अभ्यासाप्रमाणेच मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी व नवीन जगात काय चालले आहे, याचा शोध घेऊन चांगल्यासाठीच करावा, असा संदेश सुमान्यू मोरे याने संदेश दिला.