गणपती दुग्धप्राशन चमत्काराला 25 वर्षे पूर्णनिमित्त "अंनिस'च्या चमत्कार सादरीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर

रमेश दास 
Tuesday, 22 September 2020

गणपती दुग्धप्राशन चमत्काराला या वर्षी 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पर्दाफाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाइन व्हिडिओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या निकालाची घोषणा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली. 

वाळूज (सोलापूर) : गणपती दुग्धप्राशन चमत्काराला या वर्षी 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पर्दाफाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाइन व्हिडिओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या निकालाची घोषणा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली. 

या स्पर्धेसाठी कार्यकर्ता, कार्यकर्त्यांचे कुटुंबीय सदस्य आणि इतर असे तीन गट करण्यात आले होते. कार्यकर्ता गटास अपेक्षित प्रतिसाद होताच; पण खऱ्या अर्थाने आश्वासक वाटला तो कार्यकर्त्याचे कुटुंबीय सदस्य हा गट. विशेषतः यातील तरुण पिढीही कार्यकर्त्याच्या विचारकक्षेत वैज्ञानिक दृष्टिकोन समजून, रुजवून घेत आहेत, हे महत्त्वाचे वाटते. या गटात विशेषतः शाळकरी मुलींचा उत्साह आणि आत्मविश्वास कौतुकास्पद वाटला. या प्रकारच्या पहिल्याच स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 90 व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. 

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रपट नाट्य परीक्षक डॉ. अनमोल कोढाडिया (कोल्हापूर) व अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे संयोजन अंनिसचे राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, सुरेखा भापकर, डॉ. ठकसेन गोराणे, श्रेयस भारुले, अवधूत कांबळे यांनी केले. 

निकाल (स्पर्धकांचे नाव, पत्ता व प्रयोगाचे नाव) 
कार्यकर्ताचे कुटुंबीय गट 
प्रथम : आनंदी जाधव (इयत्ता चौथी) (नाशिक) : प्रश्नचिन्हाची करामत गुरुत्व मध्याच्या साह्याने 
द्वितीय : अमूर चैताली शिंदे, ठाणे (इयत्ता आठवी) : पेटता कापूर खाणे 
तृतीय : तन्वी सुषमा परेश (धुळे) : काळी बाहुली नाचविणे - भुताचा खेळ संपविणे 
उत्तेजनार्थ : सई भोसले (सोलापूर) : मंत्राने अग्नी पेटविणे, विश्वा शेलार (भिवंडी) : रिकाम्या हातातून नोटा काढणे 

अंनिस कार्यकर्ता गट 
प्रथम : अतुल सवाखंडे (चाकण) : कोंबडी संमोहित करणे 
द्वितीय : चंद्रकांत शिंदे (सांगली) : साखळीत रिंग अडकवून बाहेर काढणे 
तृतीय : भास्कर सदाकळे (तासगाव) : रिकाम्या हातातून कुंकू काढणे 
उत्तेजनार्थ : किशोर पाटील (टिटवाळा) : कमंडलूमधून गंगा काढणे, दत्ता बोंबे (कल्याण) : अतींद्रिय शक्तीने क्रूस उभा करणे, आशा धनाले (मिरज) : पंचगव्याची पॉवर 

इतर खुला गट 
उत्तेजनार्थ : तेजस्विनी योगेश (नाशिक) : हळदीचे कुंकू करणे, धनराज रघुनाथ (चंद्रपूर) : काडीपेटीच्या काड्यांची निर्मिती 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superstition Elimination Committees Miracle Presentation Competition Results Announced