कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात बाहेरून भाविक येणार नाहीत, याची दक्षता घ्या 

अभय जोशी 
Sunday, 22 November 2020

कार्तिकी यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत शहरात गर्दी होणार नाही तसेच बाहेरुन भाविक येणार नाहीत याची दक्षता संबधितांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या. 

पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत शहरात गर्दी होणार नाही तसेच बाहेरुन भाविक येणार नाहीत याची दक्षता संबधितांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या. 

कार्तिक वारी नियोजनाबाबत येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, उदयसिंह भोसले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय पाटील, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. वारी कालावधीत चंद्रभागा स्नान करुन कळसाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरात येतात. यासाठी 21 नोव्हेबर ते 1 डिसेंबरपर्यंत चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. खासगीवाले यांच्या रथोत्सावाची मिरवणूक नगरप्रदक्षिणा मार्गावरुन साध्या पद्धतीने व सामाजिक अंतराचे पालन करुन काढण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. शहरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी 24 नोव्हेबरच्या रात्री 12 ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यत पंढरपूर शहर व लगतच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. मंदीर समितीने सर्व विधी पार पाडताना कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्‍यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. 

पोलिसांकडून त्रिस्तरीय नाकाबंदी : सातपुते 
यावेळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, कार्तिक वारीत बाहेरील भाविक व नागरिक पंढरपूरात येऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी ठेवण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी विनाकारण फिरु नये. राज्य परिवहन महामंडाच्या बस शहरापासून अर्धा किलोमिटर अंतरावर थांबवून प्रवाश्‍यांची तपासणी केली जाणार आहे. बाहेरील नागरिकांना अथवा भाविकांना तेथूनच परत पाठवण्यात येणार आहे. नदी स्नानासाठी बंदी असल्याने चंद्रभागा घाटावर तसेच नदीपात्रात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनामार्फत आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care that devotees from outside do not come to Pandharpur for Karthiki Wari