पोलिस नाइकानेच केला बेकायदा वाळूसाठा ! तहसीलदारांनी ठोठावला दीड लाखाचा दंड 

हुकूम मुलाणी 
Saturday, 5 September 2020

मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गजानन पाटील यांनी लक्ष्मी दहिवडीत चार ब्रास अनधिकृत वाळूसाठा केला. याबाबतची तक्रार नागरिकांनी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी सदर गावच्या तलाठ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्या अहवालानुसार पाटील यांना एक लाख 56 हजार इतका दंड करून दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश दिले. 

मंगळवेढा (सोलापूर) : पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गजानन पाटील (रा. लक्ष्मी दहिवडी) यांनी बेकायदा चार ब्रास वाळू साठा केल्याप्रकरणी तहसीलदारांनी त्यांना एक लाख 56 हजार रुपये इतका दंड शासकीय खजिन्यात जमा करण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन न केल्याने तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्यावर त्या रकमेचा बोजा नोंद करण्याचे आदेश दिले. 

मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गजानन पाटील यांनी लक्ष्मी दहिवडीत चार ब्रास अनधिकृत वाळूसाठा केला. याबाबतची तक्रार नागरिकांनी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी सदर गावच्या तलाठ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्या अहवालानुसार पाटील यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) अन्वये 1 लाख 56 हजार इतका दंड करून दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश दिले. या वाळू साठ्यावर त्याच गावचे नागनाथ गुरव यांनीही हा साठा माझाच असल्याचा दावा केल्याने तहसीलदारांनी दोघांनाही दंड भरण्याचे आदेश काढले. दिलेली मुदत संपल्याने पुन्हा नव्याने आदेश काढून आजतागायत दंडाची रक्कम जमा न केल्याने त्या दोघांच्या सातबारा उताऱ्यावर 1 लाख 56 हजारांचा इतका बोजा नोंद करण्याचे आदेश गावच्या तलाठ्यांना देऊन या कामी दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेऊन, उताऱ्यावर नोंद केल्याचा अहवाल इकडील कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

या पोलिस कर्मचाऱ्याने जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीतून 24 मे 2019 रोजी वाळू आणल्याची पावती गौण खनिज विभागाकडे सादर केली आहे. मात्र लक्ष्मी दहिवडी येथील वाळू साठा हा जून महिन्यातील असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. मागील एक वर्षापूर्वीच्या पावत्या जोडण्यात आल्याने महसूल अधिकाऱ्यांनी त्या रद्द करून कारवाईचे फर्मान काढले आहेत. पोलिस कर्मचाऱ्याने खाकी वर्दीचा गैरवापर करत बेकायदा वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केल्याची चर्चा मात्र सध्या सुरू झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar fined to Police Naik Rs 1.5 lakh for illegal sand stock