ब्रेनस्ट्रोक झालेल्या सोलापूरच्या विवाहित कन्येला "तेलंगण'ची मदत 

Helping patient
Helping patient

सोलापूर : सोलापूरची एक कन्या गेल्या मार्च महिन्यात विवाह करून तेलंगणची सून झाली. मात्र ब्रेनस्ट्रोकमुळे या नवविवाहितेवर शस्त्रक्रिया करावी लागली. यासाठी सुमारे 20 लाखांचा खर्च आला. पण सासरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बिल भरण्याची त्यांची अडचण निर्माण झाली. तेव्हा सोलापुरातील भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी तेलंगण सरकारकडे मदत मागितली अन्‌ सरकारने या कुटुंबाला तीन लाख रुपयांची मदत देऊ केली. 

शस्त्रक्रियेचे बिल 20 लाख! 
सोलापूर येथील हरीश इप्पाकायल यांची भाची रमादेवी सिंगम हिचा हैदराबाद (तेलंगण) येथील गणेश वल्लाल याच्यासमवेत 11 मार्चला तुळजापूर येथे विवाह झाला. विवाहानंतर रमादेवी ही सासरी (हैदराबाद) नांदायला गेली. यानंतर अवघ्या काही दिवसांतच म्हणजे 25 मार्च रोजी तिला ब्रेनस्ट्रोक झाला. कोमात गेलेल्या रमादेवीला सासरच्या मंडळींनी हैदराबादमधील निझाम (निम्स) हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याच दरम्यान कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाला. निझाम हे सरकारी हॉस्पिटल असल्याने कोरोना उपचारासाठी आरक्षित झाले आणि तिथे दाखल असलेल्या रुग्णांना अन्य रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले. त्यानुसार वल्लाल कुटुंबीयांनी सिकंदराबाद येथील सनशाईन या खासगी हॉस्पिटलमध्ये रमादेवीला दाखल केले. सुरवातीला या हॉस्पिटलने शस्त्रक्रियेसाठी 11 लाखांचा अंदाजित खर्च सांगितला. उपचारानंतर मात्र हा खर्च 20 लाखांवर गेला. 

नगरसेवक वल्याळ यांच्या प्रयत्नाला यश 
दरम्यान, हॉस्पिटलने पैसे भरण्याचा तगादा लावला. एवढे पैसे भरण्याची अडचण निर्माण झाली. वल्लाल कुटुंब अडचणीत सापडले. पैशाची तजवीज करण्यासाठी खटपट सुरू केली. याबाबतची व्यथा सोलापूरचे नातेवाईक हरीश इप्पाकायल यांना सांगितली. श्री. इप्पाकायल यांनी नगरसेवक नागेश वल्याळ यांना ही बाब कळविली. यानंतर श्री. वल्याळ यांनी थेट आपल्या 10 वर्षांपासून परिचयाचे असलेले तेलंगणचे अर्थमंत्री तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जावई हरीश राव यांच्याशी संपर्क साधला. श्री. राव यांनी वल्याळ यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्याबाबत आश्‍वस्त केले. या मदतीसाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केल्यावर लगेचच तीन लाखांची मदत हॉस्पिटलकडे जमा झाली. 

मोबाईलवरून केलेल्या विनंतीवरून हरीश राव यांनी लगेच मदतीसाठी कार्यवाही केली. तेलंगण सरकारच्या मदतीमुळे वल्लाल कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. बिलात सवलत देण्याबरोबरच बिल भरण्यास काही दिवसांचा अवधीदेखील राव यांच्यामुळे शक्‍य झाले. रमादेवीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ती कोमातून बाहेर आली आहे. 
- नागेश वल्याळ,
नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com