वरवडे टोलनाक्‍याजवळ पोलिसांनी पकडला 214 किलो गांजा ! कारसह 36.41 लाखांचा मुद्देमाल जप्त

संतोष पाटील 
Saturday, 28 November 2020

सोलापूर- पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्‍यानजीक टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व त्यांचे सहकारी तसेच मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैधरीत्या विक्रीसाठी गांजा घेऊन जाणारी कार पकडली. या कारमधून सुमारे 21 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा 214 किलो 122 ग्रॅम गांजा व अंदाजे 15 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 36 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. 

टेंभुर्णी (सोलापूर) : सोलापूर- पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्‍यानजीक टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व त्यांचे सहकारी तसेच मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैधरीत्या विक्रीसाठी गांजा घेऊन जाणारी कार पकडली. मात्र कारचालक पळून गेला. या कारमधून सुमारे 21 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा 214 किलो 122 ग्रॅम गांजा व अंदाजे 15 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 36 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी सहाच्या सुमारास केली असून, टेंभुर्णी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 

याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना शुक्रवारी दुपारी चार वाजता खबऱ्यामार्फत पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच 06 / एडब्ल्यू 5922) मधील डिकीमध्ये गांजा ठेवून तो विक्रीसाठी वरवडे टोलनाका येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती मिळाली. करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांना ही माहिती कळविली. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस फौजदार अशोक बाबर, अभिमान गुटाळ, हवालदार शिवाजी भोसले, अजित उबाळे, पोलिस नाईक धनाजी शेळके, बालाजी घोळवे, विशाल शिंदे, गोविंद बचुटे, आसिफ आतार, चालक राजेंद्र खंडागळे हे कारवाई करण्यासाठी रवाना झाले. 

दरम्यान, मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पडवळ यांना सहकाऱ्यांसह वरवडे टोलनाक्‍यावर येण्यास सांगितले. त्यामुळे श्री. पडवळ हे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस नाईक केशव सुर्वे, हवालदार अमोल भोरे, पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर पवार या सहकाऱ्यांसह वरवडे टोलनाक्‍याच्या पुढे येऊन थांबले. टेंभुर्णी पोलिस व महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस कारची वाट पाहात असताना पावणेसहाच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची कार येताना दिसली. त्या वेळी समोर पोलिस असल्याचे दिसताच कारचालक कारचा दरवाजा उघडून पाठीमागील बाजूने पळून गेला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता डिकीमध्ये गांजाचे अंदाजे दोन किलो वजनाचे 107 खाकी रंगाचे चिकटपट्टी लावलेले पुडे आढळून आले. कारमधील गांजाचे वजन केले असता 214 किलो 122 ग्रॅम भरले असून त्याची किंमत 21 लाख 41 हजार 220 रुपये एवढी आहे. गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली अंदाजे 15 लाख रुपये किमतीची कार पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात हवालदार शिवाजी भोसले यांनी फिर्याद दिली असून, तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tembhurni police seized 214 kg of cannabis near Varavade toll plaza