#Lockdown : वाईन शॉपमध्ये चोरी; हव्या असलेल्याच नेल्या बाटल्या! 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 30 मार्च 2020

शटर उचकटून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये गेल्यानंतर त्याला हव्या असलेल्याच दारूच्या बाटल्या त्याने घेतल्या. ड्राव्हरमधील तीस हजारांची रोकडही चोरली.

सोलापूर  : जुळे सोलापुरातील दावत चौकातील गुलमोहर वाईन शॉपमध्ये चोरीची घटना घडली. चोरट्याने तीस हजारांची रोकड आणि इतर दारूच्या बाटल्या निवडून निवडून नेल्या आहेत. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

सोहेल शेख यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास गुलमोहर वाईन शॉपमध्ये चोरीची घटना घडली. शटर उचकटून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये गेल्यानंतर त्याला हव्या असलेल्याच दारूच्या बाटल्या त्याने घेतल्या. ड्राव्हरमधील तीस हजारांची रोकडही चोरली. असा एकूण 56 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संचारबंदीत चोरट्यांनी साधली संधी 
संचारबंदीच्या कालावधीत विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. संचारबंदीमुळे घरे बंद असल्याची संधी साधून चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. 

कोर्ट कॉलनी येथे घरफोडी
मूळ गावी देवकार्य करण्यासाठी गेल्यानंतर विजयपूर रस्त्यावरील कोर्ट कॉलनी येथे घरफोडी झाली. स्वप्नील श्रीकांत परबतराव (वय 31, रा. कोर्ट कॉलनी, संत रोहिदास चौक, विजयपूर रस्ता, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 21 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. चोरट्याने चार हजार रुपयांची रोकड, घड्याळ, दोन लॅपटॉप असा एकूण 34 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्याने घराच्या मेन दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

सुंदरमनगर येथे चोरी
सुंदरमनगर येथे 21 ते 29 मार्च या कालावधीत सैपन मदार शेख (वय 53, रा. सुंदरमनगर, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या घरात चोरी झाली. त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्याने एक तोळे सोन्याचे गंठण, सोन्याची बोरमाळ, अंगठी, चांदीचे पैंजण, चांदीचे ब्रेसलेट, पाच हजारांची रोकड असा एकूण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शेख हे गावाकडे गेले होते. घरात चोरी झाल्याचे घरमालकांनी फोन करून सांगितले. शेख हे गावाकडून घरी आले. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. चोरट्याने घरमालकाच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

अभ्यास करून घरी गेल्यानंतर घरफोडी
जुळे सोलापुरातील वसंतनगर येथेही घरफोडी झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी अमोल सुधाकर खरबस (वय 30, रा. लक्ष्मी बंगला, गांधीनगर, सोलापूर) यांनी भाड्याने घेतलेल्या घरात ही चोरी झाली आहे. ही घटना 23 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. अमोल यांचे सोलापूर शहरात घर आहे. अभ्यासाकरिता त्यांनी वसंतनगर या ठिकाणी रूम भाड्याने घेतली आहे. दररोज अभ्यास करून ते आपल्या घरी जातात. अभ्यास करून घरी गेल्यानंतर चोरट्याने संधी साधली. सेफ्टी डोअर, लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील 40 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला असे फिर्यादीत नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at a wine shop