#Crime : बंद घरातून शेजाऱ्यांना आला आवाज अन्‌ मग..

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 एप्रिल 2020

बंद घरामध्ये चोर असल्याचे लक्षात आले. पोलिस आल्याचे पाहून आतील दोघे चोर घराच्या मागील बाजूने बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर : संचारबंदी असली तरी नेहमीप्रमाणे पोलिसांची रात्रगस्त चालू होती.. विजापूर रोडवरील सुंदरमनगर येथील एका बंद घरातून आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांकडून कळाले.. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.. पोलिसांना पाहताच दोघा चोरट्यांनी धूम ठोकली.. आणि मग पोलिसांनी पाठलाग करून दोघा चोरट्यांना जेरबंद केले. 

सोलापुरात जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरळीत

आकाश महादेव उडाणशिवे (वय 21, रा. देवनगर, व्हीव्हीपी कॉलेजजवळ, सोरेगाव, सोलापूर), नितीन ऊर्फ निखिल मारुती कांबळे (वय 29, रा. साई होम्स, आदित्यनगर, विजापूर रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. नऊ गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी एकूण दोन लाख 59 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 
पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 28 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पथक रात्रगस्तीवर होते. सुंदरमनगर येथील एका बंद घरांमधून आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून पोलिसांना समजली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांचे पथक सुंदरम नगरात पोचले. बंद घरामध्ये चोर असल्याचे लक्षात आले. पोलिस आल्याचे पाहून आतील दोघे चोर घराच्या मागील बाजूने बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून निखिल कांबळे यास अटक केली. तर आकाश उडाणशिवे हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. 

लॉकडाऊनच्या नावाखाली जुगाराने धरला जोर

संशयित निखिलकडून साथीदार आकाशची माहिती काढण्यात आली. त्यानंतर रात्रगस्तीवर असलेले विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे, आयटीआय पोलिस चौकीचे बीट मार्शल, डीबी पथकातील कर्मचारी खांडेकर, लखन माळी यांनी संशयित आकाशचा शोध घेतला. माहिती काढत पोलिस संशयित आकाशपर्यंत पोचले. पोलिसांना पाहताच आकाशने पुन्हा धूम ठोकली. पळून जाताना पाठलाग करून त्यास पकडले. त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील अंदाजे पाच तोळे सोने ताब्यात घेतले. निखिल आणि आकाश या दोघांनी मिळून एकूण सहा ठिकाणी घरफोडी केल्याचे चौकशीतून समोर आले. 

निखिल कांबळे आणि आकाश या दोघांनी गेल्या तीन महिन्यांपासून आदित्यनगर, नक्षत्रनगर, नडगिरी पेट्रोल पंप परिसर, कोर्ट कॉलनी, वसंतनगर या ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार संजय खरात, हवालदार श्रीरंग खांडेकर, पोलिस शिपाई विशाल बोराडे, लखन माळी, आलम बिराजदार, कृष्णा जाधव, दत्तात्रय काटे, सुनील काटकर, दिनेश गाडे, नितीन ढावरे, सचिन जाधव, पोलिस नाईक श्रीकांत पाटील, प्रभाकर शिंदे, राठोड, सहायक फौजदार नदाफ यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves arrested at solapur