मोहोळ तालुक्‍यातील तीन जण कोल्हापुरात पॉझिटिव्ह 

अश्‍पाक बागवान 
गुरुवार, 21 मे 2020

लोकांनी सतर्क राहणे गरजेचे
इंचगावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सदर बाधित कोल्हापूरात आढळले असले तरी स्थानिक पातळीवर लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोनाबाबत प्रशासनाकडून संपूर्ण तालुक्‍यातच सर्वतोपरी खबरदारीच्या उपाय योजना राबविल्या जात आहेत. यासाठी ग्रामस्थ व नागरिकांनी स्वतःची जबाबदारीही ओळखने गरजेचे आहे. लोकांकडून अद्यापही सोशल डिस्टंस वा अन्य नियमाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ही गंभीर बाब आहे. यापुढे शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. 
- जीवन बनसोडे, तहसीलदार, मोहोळ 

बेगमपूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : इंचगाव (ता. मोहोळ) येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबातील आई व दोन मुलासह तिघांचा कोल्हापूर येथे गेल्यानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इंचगाव येथील चौदा जणांचे आज (ता. 21) गुरुवारी दुपारी संस्थात्मक विलगीकरन करण्यात आले असून सदर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 
इंचगाव येथील त्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती ही अनेक महिन्यापासून कोल्हापूर येथे ट्रक चालक म्हणून कामाला आहे. कुटूंबासह त्यांचे तेथेच वास्तव्य आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी गावच्या ग्रामदैवताचा उरूस असल्याने ते आपल्या गावी इंचगाव येथे आले होते. दरम्यान, लॉकडाउन सुरू झाल्याने त्यांना गावीच थांबावे लागले. 13 मे रोजी हे कुटूंब इंचगावहून कामासाठी पुन्हा कोल्हापूर येथे परतले असता तेथे या कुटूंबातील एक महिला व दोन मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती बुधवारी (ता. 20) कोल्हापूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिली. ही माहिती बुधवारी सायंकाळी इंचगाव व बेगमपूर येथे मिळताच खळबळ उडाली. दरम्यान, महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनाने तात्काळ सतर्कता दाखवत दक्षतेचा उपाय म्हणून सदरचा परिसर पूर्णपणे सील केला व बधितांच्या संपर्कातील चौदा जणांना येथील प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरन करण्यात आले आहे. बेगमपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश शिवशरण, कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सदर गावी धाव घेत प्राथमिक उपाय योजना केल्या. तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे यांनी सदर परिसराला भेट दिली. 
आज सकाळपासून आरोग्य व महसूल कर्मचाऱ्यांच्या नऊ पथकाद्वारे गावातील 465 घरांचे वैद्यकीय सर्वेक्षण करत निर्जंतुकिकरण करण्यात आले असल्याची माहिती वाघोली सर्कलचे मंडळ अधिकारी डी. एम. माळी यांनी दिली. गावकामगार तलाठी बी. डी. महाडिक, ग्रामसेवक जे. एस. भोसले, सरपंच अर्जुन भालेराव, उपसरपंच राजाराम वराडे, पोलिस पाटील उत्तम पाटील आदी जण उपस्थित होते. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चिंता व भीती व्यक्त केली असून बधितांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीनंतरच आजाराची सुरुवात नेमकी कोठून झाली हे समजणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three people from Mohol taluka tested corocna positive in Kolhapur