ब्रेकिंग : व्यायामाला गेलेल्या सख्या भावांचा पिकअपच्या धडकेत मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सैन्यात भरती होण्यासाठी तयारी 
विजय गुरव हा सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तयारी करत होता. तो तयारीसाठी मामा नागनाथ गुरव यांच्याकडे भोकसेवाडी (ता. सांगोला) येथे राहून अभ्यास करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो आपल्या गावी गोपाळपूर येथे राहण्यास आला होता. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर येथील दोन सख्या भावांना पिकअपने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर झाला. दोघे भाऊ पहाटे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी गेले असता हा अपघात झाला. 
या अपघाताविषयी समजलेली माहिती अशी, की गोपाळपूर येथील बाळासाहेब निर्मळे गुरव यांना विजय (वय 19) आणि दयानंद (वय 16) ही दोन मुले होती. मोठा मुलगा विजय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी त्याचे मामा नागनाथ गुरव (रा. जवळा) यांच्याकडे गावाजवळील भोकसेवाडी (ता. सांगोला) येथे राहून अभ्यास करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो गावी गोपाळपूर येथे राहण्यास आला होता. 
आज पहाटे साडेपाचच्या सुमारास विजय आणि त्याचा भाऊ दयानंद हे दोघे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी निघाले होते. त्यावेळी एका पिकअप गाडीने त्यांना धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते. परंतु दोघांचाही उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विजय आणि दयानंद यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडील बाळासाहेब हे देखील गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण आजारी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tow brothers killed in pickup crash in pandharpur