कारमधून गांजाची वाहतूक; टेंभुर्णी पोलिसांना 'इतका' किलो गांजा केला जप्त 

संतोष पाटील 
Friday, 28 August 2020

कारमधून संशयित आरोपी हा गांजा मुंबई येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले. 

टेंभुर्णी (सोलापूर) : कारमधून अवैधरित्या गांजा घेऊन जात असताना टेंभुर्णी पोलिसांनी चौघांना पकडले असून त्यांच्याकडून कारसह दहा किलो गांजा, मोबाईल असा 6 लाख 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गाच्या टेंभुर्णी येथील बायपासवर कुर्डूवाडीकडे जाणाऱ्या पुलाखाली पोलिसांनी ही कार पकडली. याप्रकरणी चौघांना अटक करून माढा न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत 
या प्रकरणी प्रशांत बिभीषण उकरंडे (वय 23), अविनाश चंद्रकांत हलकारे (वय 30), समाधान दिलीप हलकारे (वय 30), जासम महंमद शेख (वय 22, रा. सर्वजण तेरखेडा, ता. वाशी. जि. उस्मानाबाद) यांना अटक केली आहे. 
टेंभुर्णी पोलिसांना खबऱ्याकडून कारमधून विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस फौजदार अभिमान गुटाळ, पोलिस हवालदार भारत नरसाळे, पोलिस नाईक धनाजी शेळके, दत्तात्रय वजाळे, चालक पोलिस कॉन्स्टेबल पठाण यांनी सापळा लावला. गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी येथील बायपास रस्त्याच्या कुर्डूवाडीकडे जाणाऱ्या पुलाखाली ही संशयित कार (एमएच 06/सीबी 3573) अडवून कारमधील चार तरुणाना ताब्यात घेतले. तसेच कारची तपासणी केली असता डिक्कीमध्ये प्लॉस्टिक पिशवीत ठेवलेला 99 हजार 950 रुपये किमतीचा 9 किलो 950 ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करून गांजासह पाच लाख रुपये किमतीची कार, 15 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व 2 हजार 610 रुपये रोख रक्कम असा एकूण 6 लाख 17 हजार 110 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपी हा गांजा मुंबई येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये समजले. माढा न्यायालयासमोर संशयित आरोपींना हजर केले असता माढा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. एम. काझी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. विशाल सक्री यांनी तर संशतिय आरोपीच्या वतीने ऍड. संतोष कानडे यांनी काम पाहिले. तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transporting cannabis from the car Tembhurni police seized so many kilos of cannabis