कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरही उद्योग बॅंकेची "ही' ज्ञानगंगा अखंडित राहील; पण कसे? वाचा

vykhanmala
vykhanmala
Updated on

सोलापूर : पाच-सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सोलापूर शहरातील सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या उद्योग बॅंक सेवक सांस्कृतिक मंडळाची गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमाला सुवर्णमहोत्सव वर्षे पूर्ण (50 वर्षे) झाल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. उद्योग बॅंक व्याख्यानमाला म्हणजे पुण्यातील वसंत व्याख्यानमालेनंतरची महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यानमाला म्हणून ख्याती आहे. अनेक नामवंत वक्‍त्यांनी या बौद्धिक व्याख्यानमालेत आपल्या विचारांचे आदान-प्रदान केलेले आहे. 

पूर्वभागातील पद्मशाली समाज किंवा तेलुगु भाषिक हे दक्षिण भारतातून म्हणजेच तेलंगण राज्यातून उदरनिर्वाहासाठी सोलापूर शहरात वास्तव्यासाठी आले. खरं तर पद्मशाली समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे वस्त्रनिर्मिती करणे होय. विणकामाचा धागा विणत या समाजाने सोलापूर शहराशी एकसंध होऊन शहराच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य व इतर अनेक क्षेत्रांतसुद्धा आपली सेवा देण्यास सुरवात केली. त्याचाच परिणाम म्हणजे या समाजाने या शहरात अनेक बॅंका, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, सूत मिल्स यांची निर्मिती करून शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपला हातभार लावला. या समाजाने निर्मित केलेल्या चादरी व टॉवेल्सने केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे सोलापूरचा नावलौकिक निर्माण केला आणि सोलापूर शहर हे चादरींसाठी प्रसिद्ध आणि पसंतीचे शहर झाले. 

आर्थिक अडचणीमुळे व्याख्यानमाला बंद करण्याचा झाला होता निर्णय 
सोलापूरच्या राजकारणात प्रचंड दबदबा या समाजाचा होता. अनेक खासदार, आमदार, नगरसेवक या समाजाने दिले. आपल्या राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्हा औद्योगिक बॅंकेची निर्मिती करून महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक बॅंक म्हणून उद्योगांना प्रोत्साहन व चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जे उपलब्ध करून देणारी बॅंक ठरली. विशेष म्हणजे याच बॅंकेच्या दालनात बसून सोलापूरचे महापौर कोण होणार, हे ठरविले जायचे. या बॅंकेतील कर्मचारी एकत्रित येऊन उद्योग बॅंक सेवक सांस्कृतिक व्याख्यानमाला सुरू करून सोलापूरकरांची वैचारिक प्रगल्भता वाढविण्याचे कार्य करत राहिले. कालांतराने औद्योगिक क्रांती झपाट्याने वाढत असलेल्या आधुनिकीकरणात बॅंक बंद पडली. त्यानंतर देखील या बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी सातत्याने व्याख्यानमाला अखंडित चालविण्याचे प्रयत्न केले. आर्थिक अडचणीमुळे व्याख्यानमालेची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याख्यानमाला बंद करावी, असे ठरले. 

रोटरी एमआयडीसीच्या प्रयत्नाने राहिली अखंडित परंपरा 
ही बातमी सोलापुरातील अनेक वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली. ही वार्ता सोलापुरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व अन्य क्षेत्रात आपली सेवा देणाऱ्या रोटरी क्‍लब सोलापूर एमआयडीसीला समजल्यानंतर लगेच उद्योग बॅंक सेवक व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून उद्योग बॅंक व्याख्यानमाला बंद न करता अखंडित चालू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला . रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर एमआयडीसीचे सर्व सदस्य एकदिलाने, एकसंध होऊन ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून गेल्या पाचव वर्षांपासून सातत्याने उद्योग बॅंक व रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर एमआयडीसी व्याख्यानमाला या नावाने चालू ठेवून सोलापुरातील विचारवंतांना बौद्धिक मेजवानी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर एमआयडीसीचे संचालक सत्यनारायण गुर्रम म्हणाले, अनेक नामवंत व्याख्याते या बौद्धिक व्याख्यानमालेला हजेरी लावून सोलापूरकरांची बौद्धिक विचारसरणी प्रगल्भ करण्याचे प्रयत्न करत आहेत. कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी ऑनलाइन झूम ऍपद्वारे या व्याख्यानमालेचे आयोजन होत आहे. अनेक नामवंत, प्रख्यात व कीर्तिवान व्याख्यात्यांची बौद्धिक मेजवानी सोलापूरकरांसह देश-विदेशातील श्रोत्यांना देण्याचा हा प्रयत्न आहे. ही व्याख्यानमाला अखंडितपणे चालू राहील, महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची व्याख्यानमाला बनेल, यादृष्टीने सर्व पदाधिकाऱ्यांचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com