लॉकडाउनमध्ये "उमेद'अंतर्गत "या' ग्रामीण महिलांची झाली जीवनोन्नती 

Mask Making
Mask Making

मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत 1 एप्रिल ते 30 जून या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तालुक्‍यात कृती संगम कार्यक्रमाअंतर्गत महिला बचत गटांनी वंचित 505 घटकांना धान्य वाटप, रोजगारासाठी 12 हजार 800 मास्कची निर्मिती करून दुष्काळी तालुक्‍यात महिलांनी संकट कालावधीत रोजगाराचे साधन निर्माण केले. 

यामध्ये मरवडे येथील महिला बचत गटातील 50 महिलांनी 760 रुपयांचे 65 कुटुंबांना धान्याचे तर आंधळगाव येथील बचत गटातील 65 महिलांनी दीड हजार रुपये प्रमाणे लोकवर्गणी जमा करून 97 हजार वर्गणीतून 370 कुटुंबांना धान्याचे वाटप केले. तर सलगर खुर्द येथील बचत गटातील 25 महिलांनी गोरगरिबांना ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ आदी अन्नधान्यांचे वाटप केले. सध्या उमेद अभियानामार्फत पोषण परसबाग विकसन मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत तालुक्‍यास 205 परसबागांचे उद्दिष्ट आहे. प्रेरिका, कृषी सखी, सीटीसी व प्रभाग कृषी व्यवस्थापक यांच्या माध्यमातून 3 जुलैपर्यंत 48 परसबागा तयार केल्या आहेत. तर 20 गावांत बचत गटातील महिलांचे हिमोग्लोबिन तपासण्याचे नियोजन करण्यात आले. 

भोसे येथील उडान महिला ग्राम संघांतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येक बचत गटाकडून 500 रुपयांप्रमाणे वर्गणी काढून 11 हजार रुपये कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे नियोजन केले आहे. तालुक्‍यातील 15 गावांतील बचत गटातील महिलांनी लॉकडाउन कालावधीत 12 हजार मास्क तयार केले असून, सोलापूर महापालिकेस पुरवठा करून 1 लाख 20 हजार रुपयांचा व्यवसाय केला आहे. तसेच मौजे डोणज येथील प्रेरिका सुवर्णा मलगोंडे यांनी महासिद्ध विद्या मंदिर शाळेत 300 तर एमपी मानसिंग विद्यालय, कात्राळ येथे 300, खासगी दवाखान्यात 500 मास्कचा पुरवठा करून व्यवसायासाठी नवीन माध्यम उपलब्ध करून उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे. 

ढवळसच्या समृद्धी महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या सचिवा जयश्री मोरे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांनी पाठबळ दिल्यामुळे कोरोनाच्या पूर्ण लॉकडाउनच्या काळात देखील आम्ही मास्क उत्पादनाच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करून कौटुंबिक गरजांची पूर्तता करू शकलो. 

बचत गटातील महिलांनी कोरोनो संकटकाळात मास्कची निर्मिती करून रोजगाराबरोबर रोगाचा अटकाव करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी सांगितले. 

दुष्काळी तालुक्‍यामध्ये रोजगार निर्मिती करण्यात महिलांचा पुढाकार कौतुकास्पद असून, पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना यापुढील काळातही नेहमी पाठबळ राहील, असे आश्‍वासन पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com