मोठी ब्रेकिंग! कामगारांना बेरोजगारीचे टेन्शन; वाहन विक्रीत 'एवढी' घट

तात्या लांडगे
Friday, 18 September 2020

गतवर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीत मोठी घट
एप्रिल ते ऑगस्ट 2019 मध्ये सोलापूर जिल्ह्यात 25 हजार 400 हून अधिक दुचाकीची विक्री झाली होती. तर अडीच हजारांपर्यंत अन्य प्रकारची वाहने विकली होती. मात्र, कोरोनामुळे यंदा आठ हजार दुचाकी आणि साडेआठशे कार व अन्य वाहनांची विक्री झाली आहे. वाहन विक्रीत मोठी घट झाल्याने परिवहनला मिळणाऱ्या महसुलातही मोठी घट झाली आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सोलापूर : कोरोनाच्या महामारीचा अनेक उद्योग व व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट 2019 च्या तुलनेत यंदा याच काळात वाहन विक्रीत 70 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. वाहन व्यवसायातील मंदीमुळे सुमारे 20 हजारांहून अधिक कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, असा अंदाज राज्य परिवहन कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

 

मार्चपासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि संपूर्ण व्यवहारच ठप्प झाले. 72 दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात अनलॉकला सुरवात झाली. मात्र, अद्यापही ठप्प झालेले व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. वाहन विक्री करणाऱ्या शोरूम्स्‌मधील कामगारांची कपात करण्यात आली असून वाहन उद्योगातील कामगारांनाही लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. वाहनांची निर्मिती करुनही अपेक्षित विक्री होत नसल्याने या व्यवसायात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना नोकऱ्या जाण्याची भिती वाटू लागली आहे. दुसरीकडे शासनाने राज्य परिवहन विभागाला दिलेले महसुली उद्दिष्टेही पूर्ण होऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. सोलापूर विभागाला मागील वर्षी 170 कोटींचे उद्दिष्टे दिले होते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात 70 कोटींचा महसूल मिळाला होता. मात्र, यंदा वाहनांची पासिंगसह अन्य कामातून अवघे 27 कोटी रुपये मिळाले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीत मोठी घट
एप्रिल ते ऑगस्ट 2019 मध्ये सोलापूर जिल्ह्यात 25 हजार 400 हून अधिक दुचाकीची विक्री झाली होती. तर अडीच हजारांपर्यंत अन्य प्रकारची वाहने विकली होती. मात्र, कोरोनामुळे यंदा आठ हजार दुचाकी आणि साडेआठशे कार व अन्य वाहनांची विक्री झाली आहे. वाहन विक्रीत मोठी घट झाल्याने परिवहनला मिळणाऱ्या महसुलातही मोठी घट झाली आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

वाहन विक्रीची तुलनात्मक स्थिती
एप्रिल ते ऑगस्ट 2019

 • दुचाकी विक्री
 • 25,419
 • कारसह अन्य वाहने
 • 2,173
 • महसूल मिळाला
 • 70 कोटी

एप्रिल ते ऑगस्ट 2020

 • दुचाकी विक्री
 • 8,247
 • कारसह अन्य वाहने
 • 874
 • महसूल मिळाला
 • 26.37 कोटी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment tensions to workers; Decline in vehicle sales